Breaking News

अखेर वर्षभरानंतर जामखेडला तहसीलदार


जामखेड : पालकमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्याला तब्बल एक वर्षानंतर कायमस्वरूपी तहसीलदार म्हणून विशाल नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन तहसीलदार सुशील बेलेकर यांची बदली झाल्यानंतर, वर्षभरापासून जामखेड तहसीलला प्रभारी तहसीलदार म्हणून विजय भंडारी हे काम पाहत होते. 

कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे तहसील कार्यालयातील सर्व विभागातील यंत्रणा खिळखिळी झाली होती.तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राळेभात बंधुंच्या दुहेरी हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांनी तालुक्याचा कारभार तलाठी मार्फत होत असल्याची टीका केली होती. तालुक्यातील प्रभारी राज टीका झाल्यानंतर तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली. अजूनही गटविकास अधिकारी हे पद वर्षभरापासून रिक्तच आहे. आता जामखेडला गटविकास अधिकार्‍यांची नियुक्ती केंव्हा होणार याकडेच संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.