Breaking News

मोहा गावातील ग्रामसभेमध्ये कलाकेंद्रावरून खडाजंगी; सभा तहकूब


जामखेड : तालुक्यातील मोहा गावाच्या शिवारात नवीन दिवाणखाना व संगीतबारीला सात महिन्यापूर्वी दिलेल्या परवानगीची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही, या मुद्यावरुन विशेष ग्रामसभेत गोंधळ झाला. झालेल्या गोंधळामुळे ही सभा तहकूब करुन, पुन्हा 2 जूनला घेण्याचा निर्णय झाला.

मोहा ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर पंधरा दिवसात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. नवीन दिवाणखाना व संगीतबारीला परवानगी हा सभेचा मुख्य विषय होता. ग्रामपंचायत कार्यालय आवारात सकाळी 11 च्या सुमारास ग्रामसभेला प्रारंभ झाला. दिवाणखाना व संगीतबारीचा विषय चर्चेला येताच एकाचवेळी सर्व ग्रामस्थांनी परवानगी दिलेल्या कागदपत्राची मागणी केली. ग्रामसेवक पी. एस. बुधवंत यांनी कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केल्याने गोंधळास सुरुवात झाली.

उपसरपंच महादेव बांगर म्हणाले की, तत्कालीन सरपंच मुक्ता गर्जे, ग्रामसेवकाच्या कालावधीत परवानगीचा विषय झाला. याबाबत आम्हाला काहीच माहित नव्हते, असे सांगितले. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करुन ती 2 जूनला घेण्याविषयी निर्णय झाला. या सभेला तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षकांना बोलाविण्यात येईल, असे ठरले.

ग्रामसभेस सरपंच सारीका डोंगरे, उपसरपंच महादेव बांगर, ग्रामपंचायत सदस्य गोरख चौधरी, उत्तम गायकवाड, भीमराव कापसे, अशोक रेडे, वामन डोंगरे, तात्या डोंगरे, श्रीकांत रेडे, अशोक रेडे, मल्हारी रेडे, संजय डोंगरे, तुकाराम डोंगरे, शहाजी इंगळे, ग्रामस्थ उपस्थित होते. मोहा शिवारात बीड रस्त्यावर चार कलाकेंद्र अकरा वर्षांपासून आहेत. या कलाकेंद्राचा त्रास गावकर्‍यांना होतो. तत्कालीन सरपंच मुक्ता गर्जे यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्‍वासात न घेता दिवाणखाना व संगीतबारीसाठी परवानगी दिल्याने ही विशेष ग्रामसभा घेण्यात आली.