Breaking News

शेतकर्‍यांना तातडीने विम्याचे पैसे द्या- केंद्र शासनाचे निर्देश


मुंबई, दि. 27, मे - नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पीक विम्याची भरपाई मिळण्याच्या दृष्टीने केंद्रीय कृषी मंत्रालयाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्या 92 टक्के शेतकर्‍यांची माहिती पीक विमा कंपन्यांच्या माहितीशी जुळते अशा शेतकर्‍यांना विम्याची भरपाई देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरीत 8 टक्के शेतकर्‍यांची माहिती जुळत नाही ती तातडीने पुनर्निर्धारीत करुन त्यांनाही भरपाई देण्याची कार्यवाही विमा कंपन्यांनी करावी, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्राद्वारे कळविले आहे.


खरीप 2017 साठी शेतकर्‍यांनी सादर केलेल्या विमा दाव्यांच्या माहितीची तपासणी करण्यात आली असता त्यात 92 टक्के शेतकर्‍यांचे बँक खाते क्रमांकाची माहिती ही शेतकर्‍यांच्या माहितीशी जुळत आहे. उर्वरीत 8 टक्के शेतकर्‍यांच्या खाते क्रमांकांची माहिती ही शेतकर्‍यांच्या माहितीशी जुळत नाही. ही माहिती सुधारीत करुन घेण्याची जबाबदारी ही विमा कंपन्यांची आहे, असे केंद्रीय कृ षी मंत्रालयाने सर्व विमा कंपन्यांना कळविले आहे.
ज्या शेतकर्‍यांची माहिती जुळली असेल त्यांना विम्याचे दावे तातडीने त्यांचे बँक खात्यावर अदा करण्याबाबतही पत्रान्वये सूचीत करण्यात आले आहे. तसेच ज्या 8 टक्के शेतकर्‍यांची माहिती जुळत नाही त्यांची नुकसान भरपाईची रक्कम विम्या कंपन्यांनी एक रकमी बँकांकडे जमा करून बँकांनी त्या शेतकर्‍यांची माहिती जुळवून रक्कम अदा करावी, केंद्र शासनाच्या कृषी विभागाने कळविले आहे. रबी 2017 साठी विमा दाव्यांची माहिती भरण्याची मुदत ही 15 मे 2018 पर्यंत होती, ती आता 15 जून 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे.