Breaking News

नक्षलवादी हल्ल्यात सहा जवान शहीद

दंतेवाडा/वृत्तसंस्था : दंतेवाडा येथे चोलनर गावात नक्षलवाद्यांनी पोलीस दलाच्या वाहनावर केलेल्या आयईडी हल्ल्यात 6 जवान शहीद झाले असून 1 जवान जखमी झाला आहे.चोलनर परिसरात सैन्य दलाकडून शोध मोहीम सुरु आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 6 जवान शहीद झाले असून 1 जवान गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, ह्या स्फोटाची तीव्रता अधिक होती. मात्र याबाबत अधिक माहिती शोध मोहीम पूर्ण झाल्यानंतरच देता येईल, अशी माहिती अँटी नक्सल मोहीमेचे डीआयजी सुंदर राज यांनी दिली आहे. 

शहीद झालेल्या जवानांमध्ये छत्तीसगड सशस्त्र बलाच्या आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे. माहिती मिळताच सीआरपीएफने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दरम्यान, यापूर्वीही सुकमा जिह्यात सर्च ऑपरेशन करत असलेल्या जवानांवर अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये नऊ जवान शहीद झाले होते. अगोदर आयईडी ब्लास्ट करण्यात आला आणि नंतर जवानांवर गोळीबार करण्यात आला. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि सीआरपीएफक डून संयुक्त सर्च ऑपरेशन चालू आहे. याचदरम्यान नक्षलवादी जवानांवर हल्ला करत आहेत.