Breaking News

महावितरणचा शुन्य थकबाकीचा संकल्प


पुणे - आर्थिक भार हलका करण्यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उपलब्ध होणारा महसूल आणि त्यातून होणारा खर्च याचा ताळमेळ बसविण्यासाठी खुद्द वरिष्ठ अधिकार्‍यांनीच कंबर कसली आहे. त्यासाठी ग्राहकांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे थकबाकी शुन्यावर आणण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. पुढील महिन्यात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महावितरण आणि लोडशेडिंग असे समीकरणच झाले होते. हे वास्तव असतानाच प्रशासनाची पायाभूत यंत्रणाही अगदी खिळखिळी झाली होती. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यास महावितरण प्रशासनाला सपशेल अपयश आले होते, ही बाब लक्षात घेऊन ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, ही सेवा पुरविताना काही ग्राहकांचा अपवाद वगळता अन्य ग्राहकांकडून प्रशासनाला अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यामुळेच प्रशासनाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत गेला.