पुणे, दि. 06, मे - सरकारने दुधाला जाहीर केल्याप्रमाणे प्रतिलीटर 27 रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांनी 3 मे पासून ’लुटता कशाला फुकटचं न्या’ म्हणत फुकट दूध वाटप आंदोलनाला सुरवात केली आहे. या आंदोलनाची 9 मे पर्यंत सरकारने दखल घेतली नाही तर त्यानंतर राज्यभरातील दुग्ध उत्पादक शेतकरी मंत्रालयासमोर फुकट दूध वाटून आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत दिला.आंदोलनाच्या चौथ्या दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी तहसील क ार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालयात ’आमचा तळतळाट सरकारपर्यंत पोहोचवा’ म्हणत फुकट दूध वाटप करणार आहेत. भाजपच्या आमदार, खासदार यांना आमंत्रण देऊन तहसील क ार्यालयात दूध पिण्यासाठी बोलावण्यात येणार आहे. ते जर नाही आले तर त्यांच्या घरी जाऊन फुकटात दूध वाटप करण्यात येणार आहे. तालुका व जिल्हा स्तरावर आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. इतके करूनही सरकारने जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर मुंबई मंत्रालयासमोर धडक देत मंत्रालयासमोरच फुकट दूध वाटप करण्यात येणार आहे.