Breaking News

‘मेक इन इंडिया’त ‘प्रवरा’ला मान्यता


प्रवरानगर प्रतिनिधी - अहमदनगरच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शक केंद्र गठित समितीने सादर केलेला तपासणी व सोई सुविधांच्या अहवालाचा नुकताच आढावा घेतला. त्यानुसार या संस्थेने प्रवरेच्या कृषी व संलग्नित महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती प्राचार्य ऋषिकेश औताडे यांनी दिली.

ते म्हणाले, भारतामध्ये येत्या २०२२ पर्यंत पाचशे दशलक्ष कुशल मनुष्यबळाची गरज पडणार आहे. भारत हा तरुण देश आहे. एकूण लोकसंखेच्या ५४ टक्के जनता ही २५ ववर्षे वयाची आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच बेरोजगारी हटविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ व त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी ‘कौशल्य विकास’ या दोन योजना भारत सरकारने चालविल्या आहेत.

ग्रामीण भागातील अशिक्षित तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमास प्राधान्य व प्रोत्साहन दिले. त्यामुळे प्रवरेच्या परिसरातील विविध महाविद्यालयामध्ये दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा अवलंब झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेद्वारे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय व कृषी महाविद्यालय अंतर्गत कौशल्य विकास केंद्रास मान्यता मिळाली.

दरम्यान, या केंद्राची सुरुवात करण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संथेचे कौशल्य विकास समन्वयक डॉ. संपतराव वाळूंज, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे, प्रा. महेश चंद्रे, प्रा. प्राची शिंदे यांनी विशेष परीश्रम घेतले.