Breaking News

'मन की बात 'मध्ये प्रधानमंत्र्यांकडून एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूरच्या ५ आदिवासी विद्यार्थ्यांचे कौतुक


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केल्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या त्यांच्या 'मन की बात 'या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमात घेतली आहे . राज्याचे वित्त ,नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्र्यांनी शौर्य मोहिमेचे कौतुक केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी १६ मे रोजी एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूर व महाराष्ट्राचा झेंडा रोवला होता .याची दखल आज २७ मे रोजीच्या मन की बात या कार्यक्रमात घेतल्यामुळे चंद्रपूर मध्ये सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे .पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात राज्याच्या आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला 'ऑपरेशन शौर्य ' च्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. चंद्रपूर जिल्हा प्रशासन व आदिवासी विकास विभाग गेले वर्षभर या मोहिमेवर विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्यात आले होते. चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात मुळात काटक असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना थंड प्रदेशातील एव्हरेस्टच्या मोहिमेवर सिद्ध करण्यासाठी उत्तर भारतातील महत्त्वाच्या निर्यारोहक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा , जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सध्या कार्यरत असलेले गोंदिया जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आणि तत्कालीन प्रकल्प संचालक राजा दयानिधी, सध्याचे प्रकल्प संचालक केशव बावनकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते .मात्र बाजी मारली ती खऱ्या अर्थाने आदिवासी आश्रम शाळेतील ५ विद्यार्थ्यांनी. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांमधून वेगवेगळ्या चाचण्या पूर्ण करत दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या खडतर प्रवासात शेवटी पाच विद्यार्थी यशस्वी ठरले .या पाच विद्यार्थ्यांमध्ये कविदास काठमोडे , उमाकांत मडावी , परमेश आडे , मनीषा धुर्वे व विकास सोयाम यांचा समावेश आहे .

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमात आज चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचे नाव नामोल्लेख केला आणि चंद्रपूरमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. मोहिमेवरून परत येण्यापूर्वीच पंतप्रधानांनी या प्रयत्नांचा उल्लेख आपल्या राष्ट्रव्यापी भाषणामध्ये करावा यासाठी चंद्रपूरच्या जनतेने त्यांना धन्यवाद दिले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्र्यांनी चंद्रपूर येथील या घटनाक्रमाचा उल्लेख झाल्याबद्दल आभार मानले आहेत . यापूर्वीही किल्ले सफाई मोहिमेचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला होता. यासाठी प्रयत्न करणार्‍या जिल्हा प्रशासन आदिवासी विकास विभाग यांनाही या उल्लेखामुळे आनंद झाला आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात आदिवासी आश्रम शाळा प्रशासनाचेदेखील कौतुक केले आहे .आदिवासी विद्यार्थांचे हे यश इतरांनाही प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.