एमआयडीसीला होणार्या पाणीपुरवठ्याची चौकशी करा - आयुक्त ढाकणे
सोलापूर - शहरास पाणीपुरवठा करणार्या उजनी जलवाहिनीच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्यासाठी पाकणी येथे केंद्र आहे. तेथून एमआयडीसी येथील कारखान्यासाठी पाणी दिले जाते. त्यांना देण्यात येणार्या पाण्यावर नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वॉल असलेल्या ठिकाणी कुलूप लावणे आणि त्यांची चौकशी करा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाक णे यांनी दिले.
तेथील कामाची पाहणी करण्यासाठी मनपा काँग्रेस गटनेता चेतन नरोटे, बसपा गटनेता आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पाकणी जलशुध्दीकरण केंद्रास भेट दिली. पाकणी जलशुध्दीकरण केंद्रातून चिंचोळी एमआयडी येथे पाणीपुरवठा केला जातो. उजनी जलवाहिनी टाकताना एमआयडीसीचा हिस्सा असल्याने त्यांना पाणी देण्यात येते. शहरात पाणीटंचाई असताना एमआयडीसीला देण्यात येणार्या पाण्यावर नियंत्रण नाही. वॉल कधी चालू करून पाणी घेतले जाते. पाकणी जलशुध्दीकरण केंद्रात नगरोत्थान काम सुरू असून वेळेवर काम होत नसल्याचे दिसून येते. वेळेत काम पूर्ण न केल्यास मक्तेदारास रोज 2.5 लाख दंड आकारण्यात येणार आहे.
31 ऑक्टोबर पर्यंत काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास दंडाची आकारणी होईल. एमआयडीसीला सोडण्यात येणार्या पाण्याच्या वॉलवर नियंत्रण नाही. शहरात पाणी टंचाई असताना मआयडीसीला देण्यात येणार्या पाण्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे तेथे कुलूप लावण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिली. शहरात पाणी टंचाई असताना एमआयडीसीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवावे आणि जलशुध्दीकरण केंद्रातील कामावर नियंत्रण ठेवावे अशी मागणी नगरसेवक चेतन नरोटे आणि आनंद चंदनशिवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
