स्वस्त धान्य दुकानात 35 रुपये दराने मिळणार तूर डाळ
मुंबई - स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळ आता 35 रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री करण्यात येणार आहे. याबाबतच्या निर्णयाला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या स्वस्त धान्य दुकानात 55 रुपये प्रति किलो तूर डाळ विकली जात होती. या दरात कपात केल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत तूर डाळीचा पुरवठा अनुक्रमे 38 आणि 30 रुपये प्रति किलो याप्रमाणे केला जातो. या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कमीत कमी किमतीमध्ये तूर डाळीची विक्री करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. शासनाचे सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, पूर्णतः अथवा अंशतः अनुदानित संस्था याद्वारे राज्यात तूर डाळीची खरेदी केली जाते. पुढील आदेश होईपर्यंत फक्त महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडून शासकीय दरानेच ही खरेदी करणे बंधनकारक करण्यात आली आहे.
