Breaking News

नगरमध्ये दि.30 मे ते 5 जून दरम्यान प.पू.स्वामी गोविंददेव गिरीजी यांचा श्री गीता महाभारत संदेश कथा ज्ञानयज्ञ


नगर - श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट आयोजित नगर शहरात प्रथमच दिनांक 30 मे 2018 ते 5 जून 2018 दरम्यान दुपारी 3:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेत प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी ( पू. आचार्य किशोरजी व्यास ) यांचा मराठी भाषेतील श्री गीता महाभारत संदेश कथा ज्ञानयज्ञ येथील टिळक रोडवरील नंदनवन लॉनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष.नंदलाल मणियार व मोहनलाल मानधना यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाळासाहेब गांधी, डॉ.विजय भंडारी, संजय जाधव, मंजू झालानी, विनिता शहा आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, आपल्या ऐतिहासिक नगर शहरात प्रथमच गीता-महाभारत संदेश कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन होत आहे. स्वामी गोविंददेवगिरीजी यांच्या अमृतवाणीमधून महाभारत कथा श्रवण करण्याची पर्वणी भाविकांना लाभणार आहे. अधिकाधिक भाविकांना अधिक महिन्यानिमित्त या सोहळ्याचा लाभ घेता यावा यासाठी शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमाची माहिती देणारे फ्लेक्स लावण्यात आले असून निमंत्रण पत्रिका सुध्दा पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले जात आहेत. कार्यक्रमस्थळी सुसज्ज बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वाहन पार्किंगची सुविधाही येथे आहे. शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध रहाणार आहे. लॉनवर बसूनही कथाश्रवणाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.
आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सफलतेचे रहस्य जाणून घेण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीत मनाची शांती अखंडीत रहाण्यासाठी, स्वभाव दोषांनी निर्माण होणारे पारिवारीक वाद टाळण्यासाठी व मित्र कसा असावा? आणि कसा असू नये? हे समजावून घेण्यासाठी महाभारत कथेचे श्रवण करणे आवश्यक आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरूषार्थांनी मानवी जीवन परिपूर्ण होते. या चारी पुरूषार्थांचे संपूर्ण मार्गदर्शन केवळ महाभारतात मिळते. सर्व वेदांचे सार महाभारतामध्ये सामावलेले आहे. त्यामुळे महाभारत हा ग्रंथ संपूर्ण मानवी जीवनाचा मार्गदर्शक ग्रंथ ठरला आहे. भारतीय संस्कृतीचा आधारस्तंभ महाभारतच आहे. महाभारताचे वाचन आणि श्रवण केल्याशिवाय भारतीय संस्कृतीचे परिपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. कर्मयोगाचे अधिष्ठान महाभारतात आहे. गृहस्थाश्रमींना उत्तम मार्गदर्शन केवळ महाभारतच करू शकते. कर्तव्य आणि क्षात्रधर्माची उत्तम माहिती महाभारतात मिळते. महाभारतातील व्यक्तीरेखा विभिन्न मानवी प्रकृतींची प्रतिके असून जीवनातील गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढून सामर्थ्य प्रदान करण्याची दिशा भगवान वेदव्यासांनी महाभारत ग्रंथामधून दिली आहे. व्यवस्थापनाचे सर्वोत्कृष्ट तंत्र आत्मसात करण्यासाठी महाभारताचे श्रवण आवश्यक ठरते. गीतेचा सार असलेला महाभारत हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताला जाणून घेण्याची योग्यता प्राप्त होते. आजच्या युवा पिढीसाठीही हा सोहळा उत्तम शिकवण देणारी पर्वणी ठरणार आहे.

बुधवार दिनांक 30 मे रोजी कथेचा शुभारंभ ययाती कथा, शकुंतला भरत आख्यान व भिष्म चरित्र निवेदनाने करण्यात येईल. गुरूवार दिनांक 31 मे रोजी पांडवांची जन्मकथा, श्रीकृष्ण जन्मोत्सव, कौरव-पांडवांचे विद्याध्ययन व कणिक निती सांगितली जाईल. शुक्रवार दिनांक 1 जूनला लाक्षागृह प्रसंग,द्रौपदी स्वयंवर,अर्जुनाची तीर्थयात्रा,शनिवार दिनांक 2 जूनला पांडवांचा राजसूय यज्ञ, शकुनीचे कपटद्युत, पांडवांचे वनवासगमन,नलदमयंती आख्यान व अर्जूनाची शिवाराधना, रविवार दिनांक 3 रोजी सत्यवान सावित्री आख्यान, कीचक वध, अर्जूनाचे अद् भूत पराक्रम आणि अभिमन्यू- उत्तरा विवाह, सोमवार दिनांक 4 जूनला विदूरनिती, भगवान श्रीकृष्णाची शांतीयात्रा व भगवद् गीता उपदेश, मंगळवार दिनांक 5 जूनला युध्दारंभ दृष्ट संहार लिला एवम धर्मराज्याभिषेक असा कथाक्रम असेल.याच दिवशी सांगता समारंभ संपन्न होईल.

श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट आयोजित श्री गीता महाभारत संदेश कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी मोहनलाल मानधना, सुरेश चांडक, मगनभाई पटेल, पुरूषोत्तमभाई पटेल, रविंद्र गुजराथी, हर्षल शहा, अमृतभाई शहा, पुरूषोत्तम नावंदर, हर्षा गुजराथी, संतोष खंडेलवाल, सरिता गांधी, सोमनाथ नजान यांच्यासह ट्रस्टच्या सर्व समितीचे सदस्य परिश्रम घेत असून आहेत. नगरकरांनी व शहरात खास सुट्टीसाठी आलेल्या पाहुण्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गीता महाभारत संदेश कथा श्रवणाचा आनंद लुटावा, असे आवाहन श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.