Breaking News

एस.टी.च्या रिक्त 3 हजार 54 पदांसाठी भरती


सिंधुदुर्ग - एस.टी.च्या रिक्त असलेल्या 3 हजार 54 चालक कम वाहक पदासाठी जून ते सप्टेंबर दरम्यान भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात सिंधुदुर्गात 442 चालक कम वाहक निवडले जाणार आहेत. यात 134 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्याची माहिती एस.टी.च्या मुंबई विभागातून देण्यात आली.

यात कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील रिक्त असलेल्या 3 हजार 54 चालक कम वाहक पदासाठी यंदा पुन्हा एकदा भरती प्रक्रिया होणार आहे. यात जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल ; तर सप्टेंबरमध्ये लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे. या परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांना दोन महिन्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना एस.टी.सेवेत रुजू करून घेतले जाणार आहे.

एस. टी. महामंडळात गतवर्षी जुलैमध्ये 14 हजार 247 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. यात कोकणातील 7 हजार 923 चालक-वाहक पदासाठी परीक्षा घेतली ; मात्र पाच हजारपेक्षा क मी उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे उर्वरित पदे पुन्हा भरण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी जून ते सप्टेंबर 2018 पर्यंत भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले जात आहे.

मागील वर्षीच्या एस.टी.भरतीमध्ये 441 महिला उमेदवारांनी अर्ज केले होते ; परंतु एकही महिला उमेदवार पात्र ठरली नाही. यंदा महिलांसाठी 902 पदे राखीव आहेत. त्यापैकी किती पदे भरली जाणार याबाबत साशंकता आहे.