Breaking News

मान्सूनचे 28 मे रोजी होणार आगमन

नवी दिल्ली/प्रतिनिधी : देशभरात उष्णतेचा कहर सुरू असतांनाच मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळात दाखल होण्याचे संकेत हवामान तज्ञांनी दिले आहेत. यावर्षी मान्सून वेळेत दाखल होणार असल्याने हवामान तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले. याच अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात 24-25 मेच्या दरम्यान मान्सूनचा प्रवाह सक्रीय होण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान अंदमानात देखील मान्सूनचे आगमन होऊ शकेल. यंदाचा मान्सून 100 टक्के सामान्य राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला होता. तर भारतीय हवामान विभागाने पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. स्कायमेट या खासगी संस्थेनेही मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा अंदाज जाहीर केला असून, या अंदाजानुसार 28 मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षित असून त्यात दोन दिवस पुढे- मागे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. तसंच हवामान खात्याने यंदा समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे. गेली दोन वर्षं देशात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. तसेच पाण्याची भीषण टंचाई मध्य आणि उत्तर भारताला अनुभवायला लागली होती. या सगळ्या परिस्थितीत यंदा समाधानक ारक पाऊस झाल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळेल. केरळाहून राज्यापर्यंत मान्सून यायला साधारण 10 दिवसांचा कालावधी जातो. यंदाचा मान्सून समाधानकारक ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.