Breaking News

वृक्षलागवडीसाठी राज्यात 19 कोटीहून अधिक रोपं उपलब्ध


मुंबई - लोकांनी ठरवलं तर ते पर्यावरणरक्षणाच्या कामात किती उत्तम योगदान देऊ शकतात हे मागील दोन वर्षात लोकसहभागातून झालेल्या वृक्षलागवड कार्यक्रमातून दिसून आलं. हजारो हातांनी अगदी उर्त्स्फुतपणे गाव-शिवारात, वाडी-वस्तीत झाडं लावली. वन विभागाच्या वृक्षलागवडीचा कार्यक्रम फक्त शासनाचा न राहता तो लोकांचा झाला. राज्यभरात 2016 आणि 2017 साली वृक्षलागवडीचा लोकोत्सव साजरा झाला. आता 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत ही संधी पुन्हा सर्वांना उपलब्ध होणार आहे. राज्यात लागणार आहेत तब्बल 13 कोटी झाडं आणि या महावृक्षलागवडीसाठी राज्यभरातील 2142 रोपवाटिकांमधून उपलब्ध आहेत 19 कोटी 62 लाख 91 हजार 825 रोपं.. रोपं ती ही कशी ? विविध प्रजातींची. ज्याला जे झाड आवडते त्यानं त्या प्रजातीचे रोप लावायचे... पण रोप लावायचे आणि वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाचा दूत व्हायचं हे मात्र नक्की.

राज्यातील 13 कोटी महावृक्षलागवड कार्यक्रमासाठी ऊंच वाढलेली, उत्तम दर्जाची रोपं उपलब्ध व्हावीत म्हणून वन विभागाने अतिशय नियोजनपूर्वक पाऊले टाकली. राज्यात सामाजिक वनीकरण शाखा, वन विभाग, वन विकास महामंडळ, वन्यजीव मंडळ यासारख्या विविध यंत्रणांनी त्यांच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका विकसित केल्या. यामध्ये सामाजिक वनीकरण शाखेच्या 554 रोपवाटिका आहेत. तिथे 4 कोटी 71 लाख 04 हजार 045 रोपं लागवडीसाठी तयार आहेत. वन विभागाच्या अखत्यारित 1569 रोपवाटिका आहेत. येथे 14 कोटी 58 लाख 18 हजार 636 रोपं विकसित करण्यात आले आहेत. वनविकास महामंडळाच्या 13 रोपवाटिका आहेत. तिथे 33 लाख 52 हजार 706 रोपं उपलब्ध आहेत. रोपं लावू इच्छिणार्‍या प्रत्येक माणसाला रोपं मिळेल इतकी रोपं राज्यात उपलब्ध आहेत. यात इमारतीसाठी लागणार्‍या लाकूड प्रजातीची रोपं आहेत, बांबूच्या विविध प्रजाती आहेत, फळझाडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, धार्मिक दृष्टया महत्वाची आणि मागणी असलेली रोपं देखील या रोपवाटिकांमध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्मिळ वृक्षप्रजातींचा ही यात समावेश आहे.

इमारतीसाठीच्या लाकडासाठी लागणार्‍या रोपांमध्ये साग, ऐन, बीजा, हलदू, तिवस, शिसम, शिवण, खैर, दहीपळस, कडूनिंब या प्रजातींचा समावेश आहे. बांबू प्रजातींमध्ये मानवेल, कटांग, मानगा, बालकोआ, ग्रीन बांबू, चा समावेश आहे. फळझाड लागवडीसाठी आवळा, आंबा, कवठ, खिरणी, चार, चिंच, जांभूळ, टेंभरूण/तेंदू, फणस, बिबा, बोर, सीताफळ, आळीव, बेल या प्रजाती लागवडीसाठी उपलब्ध आहेत. शोभेच्या वृक्षांमध्ये बहावा, सेमल/सावर, जारुळ, पळस, पांगरा, गोल्डन बांबू, कायजेलिया, काशिद, गुलमोहर, पेल्टोफोरम, बकुळ, भेंडी, सप्तपर्णी, सिसू, स्पथोडिया प्रजातीची रोंप मिळू शकतील.

औषधी प्रजातींमध्ये आवळा, बेहडा, हिरडा, शिवण, टेटू, पारड, बेल, अग्नीमंथ, अर्जुन, गोंगल, तिखीफुली, निरगुडी, पळस, बिजा, भोवरसाल, मेडसिंग, रक्तचंदन, वर्णा, सावर, निर्मली, अंकोल या प्रजातींची रोपं मिळू शकतील. धार्मिक महत्वानुसार जी रोपं आपल्याला मागणीनुसार मिळणार आहेत त्यामध्ये जरुळ, पिंपळ, उंबर, वड, बेल, सिताअशोक, बकुळ, वर्णा, सौंदड/ शमी चा समावेश आहे. दुर्मिळ वृक्ष प्रजातींमध्ये टेटू, चंदन, अशोक, नरक्या, बिजा, बेल, रान शेवगा, नागकेशर, ओमट, राळधुप, कोकम, कडू कवठ, त्रिफळ मिळू शकेल. जंगलामधून झपाट्याने कमी होत असलेल्या गोंगल, खवसा, कुमकुम, गोंधन, मैदा लकडी/लेंजा, कड/कडाई, कुसूम, आंबाडा, निर्मली, अंकोल या वृक्ष प्रजातींचा समावेश आहे.