Breaking News

वाळू लिलावप्रकरणी जीवे मारण्याची धमकी

राहुरी तालुका प्रतिनिधी -तालूक्यातील बारागांव नांदूर मुळा नदी पात्रातील लिलाव घेतलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी कच्चा रस्ता बनवित असतांना चार जणांनी काम बंद पाडून दमदाटी केली व कोयत्याने जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राहुरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ विक्रम बर्डे राहणार बारागांव नांदूर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, बारागांव नांदूर येथील मुळा नदी पात्रातील वाळूचा लिलाव नंदूकुमार कचरु गागरे राहणार देसवंडी यांनी घेतला अाहे. त्या लिलावातून बारागांव नांदूरला आर्थिक कर मिळणार आहे म्हणून मुळा नदी ते बारागांव नांदूर कच्चा रस्ता बनवायचे काम सुरु आहे. दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजे दरम्यान रस्त्याचे काम चालू असतांना त्या ठिकाणी एकनाथ बर्डे, मज्जूभाई शेख,राजू माळी, अशोक माळी व इतर तीन ते चार जण मुळा नदीचे पात्रात असतांना तेथे सुभाष साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी व इतर दोनजण हे त्यांच्या मोटरसायकलवर तेथे आले व म्हणाले कि,तूम्ही इथल्या वाळूचा लिलाव कसा काय घेतला व रस्त्याचे काम कसे करता. ही मुळा नदी आमची आहे. आम्ही ठरवू तेव्हाच तिचा लिलाव होणार असे म्हणून एकनाथ बर्डे व त्यांच्या मित्रांना सुभाष माळी, किशोर माळी व त्यांच्या दोन मित्रांनी दमदाटी करुन तूम्ही आमच्या नादी लागलात तर कोयत्याने तोडून टाकीन,असा दम दिला. या घटने नंतर बारागांव नादूर परिसरातील सुमारे ३० ते ४० तरुणांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन एकनाथ बर्डे यांनी सुभाष माळी, किशोर माळी व इतर दोणजणां विरोधात तक्रार दाखल केली आहे.