मेघालय राज्यातील ‘अफस्पा’ हटवला केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : सुरक्षा दलांना विशेष अधिकार देणारा कायदा मेघालयातून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला. गृहमंत्रालयाने एक पत्रक काढून याबाबतची सूचना दिली. ‘अफस्पा’ हा कायदा काश्मीर आणि पूर्वोत्तरातल्या राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार सुरक्षा दलांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. या अधिकारांचा अतिरेक होतो आणि मानवाधिकारांचं उल्लंघन होतं त्यामुळं हा कायदा हटवावा अशी मागणी कायम होत असते. तर सुरक्षा दलांना अतिरेक्यांशी लढावं लागत असल्यामुळे या कायद्याची गरज असल्याचा युक्तिवाद सरकारकडून केला जातो. अरूणाचलमधल्या म्यानमारच्या सीमेजवळच्या तिरप, लोंगडिंग आणि चांगलाँग या तीन जिल्ह्यांमध्ये या कायद्याला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. या भागांमध्ये गेल्या चार वर्षात अतिरेकी कारवायांमध्ये 63 टक्क्यांची घट झाली. तर 2017 मध्ये सुरक्षा दलांवरच्या हल्ल्यांमध्ये 40 टक्क्यांची घट झाली. तर नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण 83 टक्क्यांनी कमी झाले. त्रिपुरामध्ये हा कायदा 2015 मध्येच हटवण्यात आला आहे.
