Breaking News

४८ वर्ष सत्ता भोगूनही जनतेला सबुरीचा सल्ला तालुक्याचे दुर्दैव जनता परिवर्तन करणार - आशुतोष काळे


जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच कोपरगाव तालुक्यामध्ये ज्यांच्याकडे ४८ वर्ष सत्ता होती. आज त्यांच्या पक्षाचे देशात व राज्यात सरकार आहे त्या लोकप्रतिनिधी ४८ वर्ष सत्ता भोगूनही कोपरगाव तालुक्याच्या नागरीकांना विकास कामांच्या बाबतीत सबुरीने घेण्याचा सल्ला देत आहे हे या कोपरगाव तालुक्याचे दुर्देव असून योग्य संधीची वाट पाहत असलेली तालुक्याची जनता आता परिवर्तन करणार असल्याचे सुतोवाच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील देवनदीवर १४.३८ लाख रुपयांच्या बंधाऱ्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मानाना होन होते.

पंचायत समिती कोपरगाव लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेकडे तालुक्यातील चांदेकसारे, रवंदे, आपेगाव, संवत्सर, आदी गावासाठी बंधारे बांधण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. जिल्हा परिषदेने सर्व प्रस्ताव मान्य करून जवळपास ५७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. सदरच्या निधीतून चांदेकसारे येथील देवनदीवर १४.३८ लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या बंधाऱ्याच्या कामाच्या शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, कोपरगाव तालुक्याच्या जनतेने माजी आमदार अशोकराव काळे विरोधी पक्षाचे आमदार असतांना केलेली विकास कामे व ४८ वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती व आजही आहे व देशात राज्यात सत्ताही त्यांच्याच पक्षाची आहे त्यांच्या कामाचा आलेख तपासावा. कोपरगाव तालुक्याच्या जनतेने ज्या विश्वासाने लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्या लोकप्रतिनिधींनी जनतेचा पूर्ण भ्रमनिरास केला आहे. कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने जिल्हा परिषद व पंचायत समितीची एक वर्षापूर्वी सत्ता देतांना दाखविलेला विश्वास सार्थ ठरवताना ग्रामीण भागातील विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. यामध्ये विविध ठिकाणी बंधारे, पिण्याच्या पाण्याच्या विविध योजना, रस्ते, शाळा खोल्या, संरक्षक भिंती आदी विकासकामे सुरु असून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्वच सदस्य सातत्याने पाठपुरावा करीत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची मदत होत असल्यामुळे या विकासकामांना वेग आला आहे. त्यामुळे जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे म्हणाले की, यांनी युवानेते आशुतोष काळे मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व सदस्य गेल्या वर्षभरापासून विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत त्यामध्ये अपेक्षित यश मिळून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहे. परंतु तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी अपूर्ण असलेल्या योजना जिल्हा परिषदेच्या माथी मारून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करू नये असा सूचक ईशारा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे नाव घेता दिला सभापती सौ. अनुसयाताई होन,जी.प. सदस्य सौ. सोनालीताई रोहमारे, सुधाकर दंडवते यांची भाषणे झाली. याप्रसंगी उपसभापती अनिल कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मधुकर टेके, प.स. सदस्य अर्जुन काळे, श्रावण आसने, प्रसाद साबळे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, असि. गटविकास अधिकारी वळवी,उपाभियंता घुले,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, आनंदा चव्हाण, डॉ.रोकडे, अॅड. राहुल रोहमारे, रोहिदास होन, शंकर गुरसळ, पंकज पुंगळ, मतीन शेख, पाराजी होन, नारायण होन, केशव जावळे,मोहनराव आभाळे, नंदकिशोर औताडे, योगीराज देशमुख, सोपानराव आभाळे,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.