Breaking News

कान्हेगावला जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला प्रारंभ

कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्यातील कान्हेगाव येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत कामांचे उदघाटन सरपंच संगीता आहेर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. येथील प्रभाकर भाकरे आणि गौतम डोसी यांच्या शेतात ही योजना राबवलेली जाणार आहे. यावेळी कृषी पर्यवेक्षक माणिक मंडलिक, कृषी सहाय्यक चंद्रकांत डरांगे, कचेश्वर आहेर, प्रकाश करडे, संदीप भाकरे, अनिल काजळे, प्रकाश भाकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कान्हेगावची नुकतीच जलयुक्त शिवार योजनेसाठी निवड झाली. सन २०१७ -१८ या वर्षात ही योजना राबवली जाणार आहे. या गावची लोकसंख्या सुमारे २ हजार ५ ०० असून क्षेत्र ९६० हेक्टर इतके आहे. या गावातून डाव्या कालव्याच्या दोन वितरिका गेलेल्या आहेत. तसेच गावच्या दक्षिण बाजूस गोदावरी नदी जाते. तर पश्चिमेकडून व पूर्वेस दोन चर नाले आहेत. त्यामुळे नैसर्गिक साईट या गावाला लाभलेली आहे. सर्व संस्थाचे पदाधिकारी व नागरिकांनी एकत्र येऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी बांध बंदिस्त करण्याच्या कामामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

कृषी विभागामार्फत नॅडेफ खत, गांडूळ खत निर्मिती, विहीर पुनर्भरण, फळबाग लागवडीची कामे सुरु करण्यात आली. लघु पाठबंधारे विभाग, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण व कृषी विभाग या सर्व यंत्रणा मिळून सुमारे १० लाखापर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून होणार आहेत.