Breaking News

बाजारभाव नसल्याने जाळून टाकले ’बीट’चे पीक

पुणे, दि. 11, एप्रिल - सध्या भाजीपाला व तरकारी पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच दौंड तालुक्यातील काळेवाडी येथील शेतकरी  नामदेव झुंबर बरडे यांनी 70 हजार रूपयांचा खर्च करून ऊस पिकात बीट लावले. तणनाशकाची फवारणीही केली, मात्र उत्पादन खर्च निघत नसल्याने पीक जाळून टाकले  आहे.शेतकर्‍यांनी घाम गाळून उत्पादित केलेला भाजीपाला, तरकारी आदी पिकांना बाजारात कवडीमोल बाजारभाव आहे. या कवडीमोल बाजारभावामुळे शेतकर्‍यांनी  उत्पादनावर खर्च केलेले पैसेही वसूल होत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. ऊस पिकात बीटासारखे आंतरपीक घेत शेतकरी वर्ग खर्च वसूल करण्यासाठी  ताळमेळ घालण्याचा प्रयत्न करीत असताना त्यात त्यांना अपयश येत आहे. बीट पिकास सध्या बाजारात पाच रुपये प्रति किलो बाजारभाव आहे. बी-बियाणे, मशागत,  लागण, औषध फवारणी, पिकाची बाजारात वाहतूक आदी खर्च होत असल्याने सध्याच्या बाजारभावात केलेला उत्पादन खर्चही वसूल होणे अवघड झाले आहे. नामदेव बरडे  या शेतकर्‍याने तीन एकरावर लावलेल्या बिटाच्या पिकावर 70 हजार रुपये खर्च केला असून सध्या मिळत असलेला कवडीमोल बाजारभावामुळे उत्पादन खर्च निघत  नसल्याने उभ्या पिकावरच तणनाशकांची फवारणी करून उभे पीक जाळून टाकत नष्ट करण्याचा निर्णय घेतला.