Breaking News

बिबट्याच्या हल्यात चिचंपूरचा तरुण जखमी.


संगमनेर तालुक्यातील चिंचपूर शिवारात बिबट्याने धुमाकूळ घालत बुधवारी {दि. ११} पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास येथील तरुण शेतकरी सुनील सखाराम गवारे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गवारे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुनील गवारे हे घरापासून सुमारे पाचशे फुटांवर दुर्गापूर शिवारात असलेल्या {गट नंबर ३९५ मधील} त्यांच्या शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. यावेळी भक्ष्याच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने पळत येऊन गवारे यांच्यावर हाल्ला केला. अचानक झालेल्या हल्यामुळे गवारे यांनी बिबट्याशी झुंज देत आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा आवाज ऐकून सचिन गवारे, अनिल गवारे, सखाराम गवारे, बिजला गवारे, मथुरा गवारे, संगिता गवारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्वाना पाहताच बिबट्याने तेथून धूम ठोकली. काही दिवसांपूर्वी अनिल मनकर, गवाजी मनकर, बाळासाहेब पुलाटे तर अस्तगाव येथील आंबेडकर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून हा बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी डाॅ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे व ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, चिंचपूर आणि दुर्गापूर शिवारात मागील काही महिन्यांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनापाठोपाठ आता माणसांवर हल्ला करण्यास त्याने सुरुवात केली आहे. परंतू वेळो-वेळी वनविभागाला याबाबत माहिती देऊनही वन विभागाचे अधिकारी या घटनांकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये वनविभागाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.