Breaking News

संविधानाला हात लावू देणार नाही : राहुल गांधी

नवी दिल्ली - भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाला हात लावून देणार नाही असा घणाघात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तालकटोरा मैदानावर ’सेव्ह द कन्स्टिट्युशन’ या राष्ट्रीय मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यापूर्वी हे सरकार बेटी पढाओ, बेटी बचाव, असे नारे देत होते. परंतु आता मोदीजी भाजपच्या लोकांपासून मुली वाचवा असे म्हणतील, असेही गांधी म्हणाले.


न्याय व्यवस्थेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हस्तक्षेप करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कर्मयोग पुस्तकात म्हटले आहे, की वाल्मिकी समाजातील व्यक्ती जे काम करतात ते फक्त पोट भरण्यासाठी नसते. ते अध्यात्मासाठी हे काम करतात. यातून मोदींची दलितांविरोधी मानसिकता दिसून येते. त्यांना असे वाटते, की जे मागासवर्गीय लोक स्वच्छतागृहे आणि गटारे साफ करतात त्यातून त्यांना अध्यात्मिक आनंद मिळतो. मोदींच्या सरकारमध्ये गरीब आणि दलितांसाठी जागा नाही, असे राहुल गांधी म्हणाले. दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. आणि नरेंद्र मोदी याच्याविरोधात एक शब्ददेखील बोलत नाहीत. काँग्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, आयआयटी, आयआयएम आणि एम्ससारख्या संस्था या संविधानामुळेच मिळू शकल्या. संविधानाशिवाय काहीच शक्य झाले नसते. पण आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी असलेले लोक या संस्थांमध्ये काम करत असल्याची टीका राहूल गांधी यांनी केली.