Breaking News

महत्वाचे अनुभव सध्याच्या विद्यार्थ्यांना सांगा : विखे

प्रवरानगर - ग्रामीण भागात शिक्षण देताना सुरवातीच्या काळात सुविधांचा अभाव असतानादेखील देशभरातील तरुणांनी प्रवरेच्या शिक्षण घेऊन करिअर साकारले. आज प्रवरा शैक्षणिक परिवाराअंतर्गत शिक्षणाच्या सक्षम सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी तंत्रज्ञान बदलाचा वेग प्रचंड आहे. माजी विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण अनुभव आणि आपल्या यशाचा प्रवास सध्या प्रवरा परिवारात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सांगावा, असे आवाहन राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.

नवीदिल्ली येथे आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा अभिमत विद्यापीठ आणि अहमदनगर येथील विखे पाटील फाउंडेशन या संस्थेच्यावतीने ‘प्रवरा परिवार’ या संकल्पनेतून एकत्रितपणे नवीदिल्लीच्या इंडिया ह्यॅबिटयाट सेंटरमध्ये आयोजित केलेल्या ‘प्रवरा मेगा अल्युमिनि मीट २०१८’ या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्रो. कुलपती डॉ. राजेंद्र विखे, विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, भागवत घोलप, संचालक ज्ञानदेव म्हस्के, डॉ. भास्कर खर्डे, अप्पासाहेब दिघे, बन्सी तांबे, महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, विखे पाटील फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी लेफ्टनंट जनरल बी. सदानंदा, गायकवाड, डॉ. प्रिया राव आदी उपस्थित होते.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा अभिमत विद्यापीठ आणि विखे पाटील फाउंडेशन या तीनही शिक्षण संस्थांमधील विविध महाविद्यालयांमधून १९८१ ते २०१५-१६ या वर्षापर्यंत शिक्षण घेतलेले दिल्ली आणि उत्तर भारतातील नामांकित उद्योजक, शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले दोनशे माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते.