Breaking News

राज्यात 3 मे पासून मोफत दूधवाटप आंदोलन 1 जूनला पुन्हा उठणार ‘लाल वादळ’


सांगली - राज्य सरकारच्या दूध धोरणाचा निषेध करण्यासाठी 3 मे पासून 9 मे पर्यंत ’लुटता कशाला मोफत घ्या’ हे मोफत दूधवाटप आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दूध संघर्ष समितीचे नेते व अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी दिली. सांगलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबित व मान्य मागण्यांसाठी 1 जून रोजी तहसील कार्यालयांना घेराव घालण्यात येणार असून पुन्हा शेतकरी संपाचे हत्यार उगारण्यात येईल असा इशारा डॉ. नवले यांनी राज्य सरकारला दिला. सांगलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने लाँग मार्च काढण्यात आला होता. मात्र दोन महिने उलटूनही अद्याप सरकारकडून मागण्यांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. शेतकर्‍यांच्या विविध मागण्याही प्रलंबित आहेत. त्यामुळे किसान सभेकडून पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी डॉ. नवले यांनी दिली. 1 जूनपासून राज्यात पुन्हा आंदोलन छेडण्यात येणार असून यादिवशी राज्यातल्या सर्व तहसील कार्यालयांना घेराव घालण्यात येणार असल्याचेही डॉ. नवले यांनी सांगितले. 
राज्य सरकारने दूध दरात कपात करत 10 रुपये दर कमी करण्यात आला आहे. राज्यात दूध उत्पादक शेतकर्‍यांची सरकार व दूध व्यावसायिकांकडून लूट सुरु असल्याचा आरोपही डॉ. नवले यांनी यावेळी केला. येत्या 3 मे पासून सरकारच्या दूध धोरणाला विरोध करत शेतकरी मोफत दूधवाटप आंदोलन करणार आहे. 3 मे पासून 9 मे पर्यंत राज्यातील सरकारी कार्यालये, सत्ताधारी पक्षांचे नेते यांना मोफत दूधवाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. यावेळी शहरी भागांना ग्रामीण भागातून होणारा दूध पुरवठा रोखण्यात येणार असल्याचा इशाराही डॉ. नवले यांनी सरकारला दिला आहे. 
दरम्यान, शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यासह देशभरात शेतकर्‍यांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात 20 लाख तर देशात 1 कोटी शेतकर्‍यांच्या सह्यांचा संकल्प करण्यात आला असून या सह्यांचे निवेदन 1 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. अजित नवले यांनी दिली.