Breaking News

निवारा बालगृहाच्या बांधकामास रवि सुरवसे यांचेकडून वीटांची मदत


तालुक्यातील ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या वतीने अनाथ, निराधार, लोक कलावंत, ऊस तोड मजूर, वीट भट्टी कामगार, दलित, आदिवासी, वंचित दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या निवारा बालगृहाच्या बांधकामास जामखेड तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा जामखेड पंचायत समितीचे सदस्य रवि सुरवसे यांनी काही दिवसांपूर्वी दैनिक लोकमंथनच्याा माध्यमातून बालगृहाचे बांधकाम मदतीअभावी बंद असल्याची बातमी वाचून लोक सहभागातून सुरू असलेल्या उपक्रमास निश्‍चित हातभार लावत उपक्रम उभा करण्यासाठी आपल्या वाढदिवसानिमित्त 3000 वीटांची मदत जाहीर करून सदर उपक्रम गोर गरीब विद्यार्थी घडवण्याचे कार्य करीत असून या उपक्रमात सर्वांनी मिळून मिसळून काम पुढे घेऊन जाण्याचे व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले. संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामास शुभेच्छा दिल्या. निवारा बालगृहाचे वृत्त दैनिक लोकमंथनमध्ये प्रसिद्ध होताच सुरवसे यांनी हातभार लावला आहे. 
संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. डॉ. अरूण जाधव यांनी रवि सुरवसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन, केलेल्या मदतीबद्दल आभार मानून बाकीच्या देखील लोकप्रतिनिधी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनी आदर्श घेऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे. निवारा बालगृहाचे अधिक्षक संतोष गर्जे, शिक्षक बाबासाहेब डोंगरे यांनीही बालगृहाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.