Breaking News

अरविंद सुर्यवंशी यांना सहआरोपी करण्याची मागणी,आ. चरणभाऊ वाघमारे यांचे प्रधान सचिवांना पत्र

मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी ‘नरो वा कुंजरो’ ची भुमिका घेऊन एका निशाण्यावर अनेकांची शिकार करण्याचा खेळ खेळत असल्याने साबांतील भ्रष्टाचार बोकाळत असल्याचे निष्पन्न झाल्याने सुर्यवंशी यांच्यावर आधी कारवाई करा, अशी मागणी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांच्याकडे बुधवारी एका पत्रान्वये केली आहे. आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या या मागणीमुळे साबांतील भ्रष्टाचारीमुळे अधिक्षक अभियंता कार्यालयात रूजली असल्याच्या लोकमंनच्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे.

मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील वेगवेगळ्या मंडल कार्यालयात कार्यकारी अभियंता पातळीवर सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला अधिक्षक अभियंता कार्यालय पातळीवर पाठबळ मिळत असल्याचे आजवरच्या घटनाक्रमावरून स्पष्ट झाले आहे. शहर इलाखा आणि मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात सध्या चर्चेत असलेल्या कोट्यावधी रूपये शासकीय निधीच्या अपहार प्रकरणी शासन निर्देशीत कारवाई करताना अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी घेतलेली दुटप्पी भुमिका आणि अपहारात सहभागी असलेल्या काही दोषींना वाचविण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड संशय निर्माण करीत आहेत.शासनाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवाल निष्कर्षावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश नाकारण्याचे अधिक्षक अभियंता अरविंद यांचे धाडस लोकसेवक अधिनियम तसेच शिस्तभंग कायद्याचे सरळ उल्लंघन करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. भादंवि आणि मुंबई पोलीस कायदा सीआरपीसी प्रमाणे गुन्हेगाराचा बचाव करणे, गुन्हेगाराला पाठीशी घालणे, गुन्हेगारी प्रकाराचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करणे, आपले अधिकार वापरून गुन्हेगाराच्या बचावासाठी परिस्थिती निर्माण करणे किंवा तसे पुरावे निर्माण करण्यास मदत करणे या गोष्टी करणारा गुन्हेगाराइतकाच दोषी मानून सदर गुन्ह्यात सहआरोपी ठरू शकतो. आ. चरणभाऊ वाघमारे याचाच आधार घेऊन अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन महिन्यात झालेल्या चोवीस कोटी अपहार प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांना बुधवारी केली आहे.
प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांना पाठवलेल्या पत्रात आ. चरणभाऊ वाघमारे यांनी म्हटले आहे की, मध्य मुंबईच्या अपहार प्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठी दि. 6 फेब्रुवारी रोजी शासनाने दिलेले आदेशपत्र, त्या आदेशपञाच्या अनुषंगाने मुंबई साबांचे मुख्य अभियंता यांनी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना 22 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. अरविंद सुर्यवंशी शासनाच्या 6 फेब्रुवारी 2018 च्या आदेशात नमुद असलेल्या दोषींपैकी काही आरोपींची नावे परस्पर आणि हेतूपुरस्सर वगळून एफआयआर नोंदविली असल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. अरविंद सुर्यवंशी यांची ही कृती शासनाचा आदेश डावलणे, वरिष्ठांचा आदेश पायदळी तुडवणे, शासन आदेशातील मजकूर गाळून हवा तेवढा वापरणे, काही दोषींची नावे वगळुन त्यांचा गुन्हा लपविणे, त्यांना सहकार्य करणे अशा पध्दतीचे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. म्हणून दक्षता गुणनियंत्रक पथकाने चौकशी करून शासनास सादर केलेल्या अहवालानुसार शासनाने दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी न करता या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे अरविंद सुर्यवंशी यांना सह आरोपी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केली आहे.