Breaking News

शेवगाव, पाथर्डीतील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बोंडअळीचे अनुदान मार्च आखेर देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- बोंडअळीच्या अनुदानातून शासनाने शेवगाव, पाथर्डी तालुका वगळल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना सदरील अनुदान मार्च आखेर मिळण्याच्या मागणीसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने जि.प. सदस्या हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी अधिकारी विलास नलगे यांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बोंडअळीच्या अनुदान न मिळाल्यास अधिकार्‍यांना शेवगाव, पाथर्डीत फिरकू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला. 

 
शेवगाव, पाथर्डी तालुक्यामध्ये गेल्या सात ते आठ वर्षांपासून शेतकरी कपाशी हे प्रमुख पीक शेतामध्ये घेत आहे. परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशी पिकावर अनेक रोग पडून, या पिकाचे नुकसान झाले आहे. यावर्षी कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन कपाशीचे पीक शंभर टक्के वाया गेले आहे. शेतकर्‍यांनी पिकासाठी बियाणे, फवारणी, मेहनत, मशागत यासाठी जो खर्च केला त्याचा पंचवीस टक्के सुध्दा झालेल्या खर्चाची रक्कम शेतकर्‍यांना कपाशी पिकातून मिळालेली नाही. शासनाने मध्यंतरी कपाशी पिकाचे पंचनामे केले असता शेतकरी बोंडअळीची नुकसान भरपाई मिळेल या आशेवर आहे. परंतु शेवगाव पाथर्डी तालुका बोंडअळीची अनुदानातून वगळलेले असल्याची माहिती मिळालेली आहे. याला शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी जबाबदार असून, बीड जिल्ह्यामधील शेतकर्‍यांना पंकजाताई मुंडे यांनी बोंडअळीची नुकसान भरपाई त्वरीत मिळून दिली आहे. वास्तविक पाहता शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतकरी बोडअळीमुळे संकटात सापडले आहे. सदरील तालुके हे कॉटनयुक्त असून, प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे त्यांना अनुदानातून वगळण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मार्च आखेर असताना शेवटच्या आठवड्यातच आलेला निधी शेतकर्‍यांना मिळू शकतो अन्यथा तो मागे गेला तर पुढील वर्षापर्यंत मिळणार नाही. नुकसान भरपाईसाठी आलेला निधीचा योग्य वापर होवून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांवर अन्याय होवू न देता त्यांना तातडीने अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. मार्च आखेर सदरील अनुदान नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना न मिळाल्यास जनशक्ती विकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन उभे करुन अधिकार्‍यांना शेवगाव, पाथर्डी तालुक्यात फिरणे मुश्कील करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, मानिक गरजे, राजू भांगरे, देवीदास फुंदे, गणेश उगले, भागवत भोसले, अजय पडोळकर, गोपाल कुठे, नारायण फुंदे, बाळकृष्ण खरेकड आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.