Breaking News

आदिवासींच्या घरे उजळली प्रकाशाने


नागपूर,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहज बिजली हर घर योजने अंतर्गत जिल्ह्यातील एक कोपर्‍यावर असलेल्या सालेघाट आणि अंबाझरी या दोन आदिवासी गावातील 45 ग्राहक ांना महावितरणकडून निःशुल्क वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली.

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुका मुख्यालयापासून सुमारे 50 किलोमीटर दूर असलेल्या पेंच अभयारण्यात सालेघाट आणि अंबाझरी या गावात 4 वर्षांपूर्वी वीज पोहचली होती. काही गावक र्‍यांनी नियमित शुल्क भरून वीज जोडणी घेतली होती पण काही गावकर्‍यांना सशुल्क वीज जोडणी घेणे शक्य नव्हते. परिणामी रात्रीच्या वेळी अनेक घरे मेणबत्ती- कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात प्रकाशमान व्हायचे . अश्या ग्राहकांच्या जीवनात महावितरणकडून प्रकाशाची किरणे पोहचवण्यात आली. या दोन गावात वीज पोहचवण्यासाठी महावितरणला बडेगाव-सुरावाही मार्गे वाहिनी टाकावी लागली. सालेघाट आणि अंबाझरी हि दोन्ही गावे पेंच अभयारण्यात येत असल्याने येथे वन्य जीवांसोबतच हिंस्त्र प्राण्यांचा वावर या परिसरात सातत्याने असतो. पण येथील घरात आता वीज पोहचल्याने गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसत होते.

महावितरणकडून आज सालेघाट येथील 24 घरातील विदुयतीकरणाचे काम पूर्ण झाले असून अंबाझरी येथील कामही पूर्ण झाले आहे.सालेघाट येथे एकूण 72 घरे तर अंबाझरी येथे 85 घरे आहेत. दोन्ही गावात प्रत्येक ग्राहकाला वीज जोडणी देण्यासाठी महावितरणला सरासरी 4 हजार रुपये खर्च झाला. महावितरणकडे असलेल्या उपलब्ध साधनांचा वापर करून सालेघाट आणि अंबाझरी हि दोन्ही गावे प्रकाशमान करण्यात आली. ग्रामीण आणि शहरी भागात वीज उपलब्ध नसलेल्या दारिद्र्य रेषेवरील ग्राहकांना 500 रुपयात तर दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकांना मोफत वीज जोडणी देण्यात यात आहे. अति दुर्गम भागातील वीज ग्राहकांना प्राधान्याने वीज जोडणी उपलब्ध करून देणे हा योजनेचा मुख्य हेतू आहे. दुर्गम भागातील वीज ग्राहकांची घरे या योजनेमुळे प्रकाशमान होण्यास मदत होणार आहे. सौभाग्य योजनेत नियमित स्रोताने वीज पुरवठा करता येत नसेल तर सौर ऊर्जेने वीज ग्राहकाला वीज पुरवठा करण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे.