Breaking News

दहा दिवसीय जिल्हास्तरीय युवक-युवतींच्या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

शाश्‍वत विकासासाठी युवकांमध्ये विचारमंथनाची आवश्यकता आहे. युवक बेजबाबदार नसून, प्रौढांपेक्षा ते अधिक जबाबदार व संवेदनशील आहे. जगातील अनेक देशात युवकांनी क्रांती घडविली असून, युवकांनी ठरविल्यास परिवर्तन घडणार आहे. यासाठी युवकांसमोर चांगले आदर्श असण्याची गरज आहे. चांगला वैचारिक दृष्टीकोन नसल्यास त्या ज्ञानाला व कुशलतेला अर्थ नाही. दृष्टीकोनासह युवकांमध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाची भुमिका बजावणार असल्याचे मत सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांनी व्यक्त केले.

क्रीड व युवक सेवा संचालनालया अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जागतिक समाज कार्य दिनानिमित्त अरणगाव येथील मनुष्यबळ विकास केंद्र (कासा) संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय जिल्हास्तरीय युवक-युवतींसाठी निवासी प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.पठारे बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, जय युवा अ‍ॅकॅडमाचे अ‍ॅड.महेश शिंदे, कासाचे प्रकल्प अधिकारी सुनिल गायकवाड उपस्थित होते.
प्रास्ताविकात ज्ञानेश्‍वर खुरांगे म्हणाले की, विचार व कृती करणारा युवक असतो. तरुणांच्या या देशात विकासात्मक राष्ट्र उभारणीत युवकांचा मोलाचा वाटा ठरणार आहे. यासाठी युवकांना दिशा देण्याची गरज असून, या उद्देशाने शिबीराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उदय जोशी म्हणाले की, विकासात्मक राष्ट्र उभारणीसाठी युवकांनी अगोदर स्वत:ला घडविले पाहिजे. युवकांचे वैचारिक परिवर्तन झाल्यास बदल घडणार आहे. शाररिक तंदुरुस्तीसह मानसिक तंदुरुस्ती देखील आवश्यक आहे. शरीर तंदुरुस्त असल्यास मन देखील तंदुरुस्त राहू शकते. युवकांनी व्यक्त होण्याची गरज असून, व्यक्त झाल्यास प्रश्‍न सुटणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी पै.नाना डोंगरे, पोपट बनकर, स्वाती बनकर, जयश्री शिंदे, दिनेश शिंदे, दर्शन बनकर, ओमकार वाघ, गणेश खंडागळे, संदेश पाटोळे आदि उपस्थित होते.
दहा दिवसीय या निवासी प्रशिक्षिण शिबीराला जिल्ह्यातील युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला असून, यामध्ये नेतृत्वशैली, नेतृत्व आणि शक्ती, सामाजिक विकास आणि युवक, हवामानातील बदल आणि युवक तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात युवकांची जबाबदारी या संदर्भात त्यांना तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे. या शिबीराला जय युवा अ‍ॅकॅडमी व मनुष्यबळ विकास केंद्र (कासा) संस्थेचे सहकार्य लाभले आहे.