येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने आज हरभरा खरेदी केंद्र जामखेडला सुरू करण्याच्या मागणीसाठी, खर्डा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी चौकात चारही बाजूने वाहनांची मोठी रांगच रांग लागली होती. यावर्षी जामखेड तालुक्यात प्रचंड पिक झालेले आहे. मात्र शासनाने तालुक्याचे ठिकाण सोडून एक छोट्या खर्डा या गावात एकच हरभरा केंद्र सुरू केले आहे. खर्डा या गावी हरभरा केंद्र सुरू केल्यामुळे तालुक्यातील खेडे गावातील नान्नज, जवळा, अरणगाव, पाटोदा, डोणगाव, साकत, चौंडी, पिंपरखेड, हलगाव, आगी, मतेवाडी, पोतेवाडी, गुरेवाडी या परिसरातील शेतकर्यांना खर्डा हे केंद्र अडवळणी मार्गावर आहे. वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोय होत आहे. जामखेड तालुका सोडून तीन जिल्हयाच्या सरहद्दीवर असणार्या छोट्या गावात शासनाने जाणून बुजून हरभरा केंद्र सुरू केले आहे. शासन शेतकर्यांची मुद्दाम पिळवणूक करत आहे. हरभरा खरेदीकेंद्र जामखेड येथे सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर तात्काळ दखल घेण्यात आली असून, नाफेडच्या अधिकार्यांशी चर्चा करून शासकीय हरभरा खरेदी केंद्र जामखेडला सुरू करण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकर्यांना येत असलेल्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी भाजपा सरकारवर कडाडून टीका करण्यात आली आहे. प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी जि. प. सदस्य प्रा. मधुकर राळेभात, माजी जि. प. सदस्य शहाजी राळेभात, माजी तालुकाध्यक्ष सुरेश भोसले, पाटोदा गरडाचे मा. संरपच समीर पठाण आदिंनी भाषण करून तहसीलदार विजय भंडारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नरेंद्र जाधव, नगरसेवक पवन राळेभात, अमित जाधव, संभाजी राळेभात, राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, प्रकाश काळे, शरद शिंदे, संजय वराट, शरद भोरे, राहुल आहिरे, बिभीषण परकड, विश्वनाथ राऊत, अमोल गिरमे, आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
राष्ट्रवादीचा जामखेडमध्ये रास्ता रोको आंदोलन हरभरा केंद्र सुरू करण्याची मागणी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:10
Rating: 5