Breaking News

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडे 162 कोटींची थकबाकी

नाशिक, दि. 29, मार्च - महावितरणच्या नाशिक परिमंडळात पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी ग्रामपंचायतींकडे 4 हजार 878 वीजजोडण्यांचे 162 कोटी रुपये थकीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अखंडित वीजसेवेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार त्यांच्या स्वनिधी, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून पथदिव्यांचे चालू व थकीत वीजदेयके भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.


शासनाच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना फेब्रुवारी अखेरीस एका पत्रान्वये राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील विजेच्या दिव्यांच्या थकीत देयकांबाबत निर्देश दिले आहेत. राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांची बरीचशी वीजबिले थकीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर थकीत बिलांसाठी महावितरण विद्युत कं पनी वीज जोडणी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि पुढील गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून, चौदावा वित्त आयोग किंवा इतर निधीतून ही थकीत बिले भागविण्यात यावी, व त्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठविण्यात यावी, असे या पत्रात निर्देशित करण्यात आले आहे.
नाशिक मंडळातील ग्रामपंचायतीकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी 1 हजार 720 वीजजोडण्यांचे 53 कोटी 78 लाख रुपये थकीत आहेत. त्यात सर्वाधिक नाशिक ग्रामीण विभागात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या 998 वीजजोडण्यांचे 38 कोटी 71 लाख रुपये, नाशिक शहर विभाग दोनमध्ये 384 वीजजोडण्यांचे 2 कोटी 22 लाख रुपये, चांदवड विभागात 338 वीजजोडण्यांचे 12 कोटी 84 लाख रुपये चालू व थकीत वीजदेयके आहेत. मालेगाव मंडळातील ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या वीजदेयकापोटी 1 हजार 21 वीजजोडण्यांचे 23 कोटी 32 लाख रुपये थकीत आहेत. त्यात सर्वा धिक कळवण विभागात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या 256 वीजजोडण्यांचे 7 कोटी 26 लाख रुपये, मनमाड विभागात 271 वीजजोडण्यांचे 5 कोटी 79 लाख रुपये, मालेगाव विभागात 266 वीजजोडण्यांचे 5 कोटी 59 लाख रुपये, सटाणा विभागात 228 वीजजोडण्यांचे 4 कोटी 79 लाख रुपये चालू व थकीत वीजदेयके आहेत.