Breaking News

लोणी ग्रामस्‍थांना महिन्याभरात पाणी योजनेचा लाभ : विखे


लोणी।प्रतिनिधी  :- २०३० पर्यंतच्‍या लोकसंख्‍येचा विचार करुन सुमारे ७० कोटी रुपये खर्चाची कार्यान्वित होत असलेली पाणी पुरवठा योजना आता जलशुध्‍दीकरण प्रकल्‍पासह पूर्ण होत आहे. येत्‍या महिन्‍याभरात लोणी ग्रामस्‍थांना या पाणी योजनेचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे यांनी दिली.
लोणी खुर्द गावामध्‍ये विरोधी पक्षनेते विखे आणि जिल्‍हा परिषदेच्या अध्‍यक्षा शालिनी विखे यांच्‍या प्रयत्‍नांमुळे विविध योजनांच्‍या सुमारे ३ कोटी रुपये खर्चाच्‍या विविध विकासकामांचा भूमिपूजन आणि उदघाटन समारंभ नुकताच पार पडला. याप्रसंगी विरोधी पक्षनेते विखे यांनी लोणी खुर्द ग्रामस्‍थांशी संवाद साधला. जेष्‍ठ नेते के. पी. नाना आहेर कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्थानी होते. यावेळी सभापती हीराबाई कातोरे, उपसभापती बबलू म्‍हस्‍के, बाजारसमितीचे सभापती बापूसाहेब आहेर, शांतीनाथ आहेर, पंचायत समिती सदस्‍य संतोष ब्राम्‍हणे, उत्‍तमराव घोगरे, संपतराव आहेर, भानुदास घोगरे, वसंत घोगरे, बाळासाहेब आहेर, शिवाजीराव आहेर, रामनाथ आहेर, संजय आहेर, नितिन घोगरे, डॉ. हरिभाऊ आहेर, सरपंच मनिषा आहेर, उपसरपंच सुवर्णा घोगरे, तहसिलदार माणिकराव आहेर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

विखे म्‍हणाले, गावच्‍या पाणी पुरवठ्यासाठी डॉ. हरिभाऊ आहेर आणि त्‍यांच्‍या परिवाराने ४ गुंठे जागा देऊन जी सामाजिक बांधिलकी जोपासली, त्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. गावासाठी कार्यान्वित होत असलेल्‍या या पाणी पुरवठा योजनेचे कामही आता मार्गी लागत आहे. १८ कोटी रुपयांचा या योजनेचा सुरुवातीला खर्च होता. १० टक्‍के लोकवर्गणीची अटही होती. पण यामध्‍ये निर्माण झालेल्‍या प्रश्‍नात मार्ग काढला आणि ७० कोटी रुपयांची ही योजना आता जलशुध्‍दीकरण प्रकल्‍पासह पूर्ण होत आहे. 

जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनी विखे यांनीही मनोगत व्यक्त केले. लोमेश्‍वरनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.