दखल - सोशल मीडिया’चा गुरू !
भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीत जे यश मिळविलं, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा जेवढा वाटा होता, त्यापेक्षा अधिक वाटा भाजपच्या ‘सोशल मीडिया’वरील प्रचाराचा होता. काँगे्रसला घेरून तिच्यावर अॅटॅक करण्याचं करण्याचं काम भाजप समाज माध्यमातून करीत होता. त्याच वेळी काँगे्रसनं मात्र समाज माध्यमांकडं पूर्णतः दुर्लक्ष केलं. त्याची किमंत काँगे्रसला मोजावी लागली. त्या वेळी भाजपच्या प्रचाराचं नियोजन प्रशांत यांच्याकडं होतं. आता मात्र काँगे्रसनं ‘सोशल मीडिया’वर लक्ष केंद्रीत केलं आहे. मागच्या काही महिन्यांपासून राहुल गांधी सातत्यानं ट्विटर, फेसबुक आदी माध्यमांचा वापर करीत आहेत. त्यासाठी युवकांची मोठी टीम कार्यरत आहे.
भाजपच्या नेत्यांच्या चुका हेरून त्यावर तातडीची प्रतिक्रिया देणं, मोदी यांच्या भाषणांवर टीका करणं आदी कामं हे पथक करीत असतं. त्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जातो. गुजरातच्या निवडणुकीत काँगे्रसनं केलेल्या समाज माध्यमांचा वापर फायद्याचा ठरला होता. जिग्नेश मेवाणी, हार्दीक पटेल यांच्यासारखी तरुण मंडळी काँगे्रसची नसली, तरी मित्रपक्ष म्हणून आणि भाजपला धडा शिकविण्यासाठी काँगे्रसला मदत करीत असतात. गुजरातचा युवा नेता हार्दीक पटेल मुंबई काँगे्रेसच्या ‘सोशल मीडिया टीम’चा गुरू बनणार आहे. मुंबई काँग्रेसनं आपल्या ‘सोशल मीडिया टीम’ला प्रभावी करण्यासाठी हार्दीकच्या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. हार्दीकनं मुंबई काँग्रेसच्या ‘सोशल मीडिया’ त भारतीय जनता पक्ष व मोदी-शहांच्या खोटया प्रचाराला उत्तरं कशी द्यायची याचा गुरूमंत्र दिला. हार्दीक पटेल हा गुजरातमधील पाटीदार अमानत आंदोलन समितीचा नेता आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दीकनं फक्त रस्त्यावर उतरूनच नव्हे, तर ‘सोशल मीडिया’द्वारेही सत्ताधारी भाजप सरकारची हवा काढली होती. गुजरातमध्ये निवडणुकीदरम्यान ‘विकास गांडो थयोे ’ म्हणजेच विकास वेडा झालाय ही टॅगलाईन हार्दीकच्या माहिती तंत्रज्ञान कक्षानं पुढं आणली होती. हीच टॅगलाईन गुजरातमध्ये विरोधी पक्षाच्या प्रचाराची थीम बनली. आता महाराष्ट्रात वर्ष-दीड वर्षावर लोकसभा व पाठोपाठ विधानसभा निवडणुका होत आहेत. भाजपमधील मंडळी राज्यातील लोकसभा व विधानसभा एकत्र घेण्याचा विचार करत आहे. त्यामुळं काँग्रेसनं ‘सोशल मीडिया’चं महत्त्व लक्षात घेता त्याच्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. यासाठी काँग्रेसनं राज्य, जिल्हा, ब्लॉक स्तरावरसुद्धा ‘सोशल मीडिया टीम’ तयार केल्या आहेत.काँगे्रस आगामी निवडणुकीत फेसबुक, टि्वटर, व्हॉट्सअॅपद्वारे आपला आवाज जनतेपर्यंत पोहचविणार आहे. काँगे्रसनं 2019 साठी ‘सोशल मीडिया’वर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजप व मोदींनी 2014 ची लोकसभा निवडणूक ‘सोशल मीडिया’द्वारेच गाजवली. तेव्हा काँग्रेस ‘सोशल मीडिया’बाबत गाफिल राहिली; मात्र आता त्यांना ‘सोशल मीडिया’चं महत्त्व व ताकद कळाली आहे. राहुल गांधी बदलले आहेत. आता अन्य कार्यकर्त्यांनी बदललं पाहिजे, अशी भूमिका पक्षाची आहे. त्यासाठी समाज माध्यमांवर सातत्यानं दक्ष असलेल्या कार्यकर्त्यांची फळी घडविली जात आहे. भाजपच्या अपप्रचाराला कसं उत्तर द्यायचं आणि राहुल व काँग्रेसच्या ध्येय धोरणाबाबत सकारात्मक माहिती कशी पोचवायची, याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर आता काँग्रेसच्या काळातील चांगल्या कामांची माहितीही समाज माध्यमातून टाकली जाणार आहे.