Breaking News

लाखो रुपयांची दुचाकी वाहने पडली अनेक वर्षांपासून धूळखात


नेवासा/श. प्रतिनिधी/- शहरातील पोलीस ठाण्याच्या आवारात लाखो रुपयांची दुचाकी वाहने गेल्या अनेक वर्षांपासून धूळखात पडली असून त्यातील काही वाहनांची तर अक्षरशः माती झाली आहे.पोलीस ठाणे, तहसील कार्यलय तसेच पोलीस ठाण्यासमोरील पोलीस वसाहत कंपाऊंड मध्ये तसेच प्रवरासंगम दुरक्षेत्र येथे अनेक वर्षांपासून ही दुचाकी वाहने एकाच ठिकाणी पडली असल्याने या वाहनांचा काही भाग निकामी तर काही महत्वाचे भाग गायब झाले आहे. या मधील काही वाहनाचा नोंदणी कालावधी देखील संपला आहे. तर काही वाहनांची अक्षरशः माती झाली आहे. असे असताना याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करताना प्रशासन दिसत असून, या वेळकाढू पणामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसेंदिवस या वाहनांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते.
या वाहनांचे लिलाव करणे गरजेचे असून प्रशासनाने या विषयाकडे त्वरित लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे. तरी वरिष्ठ स्तरावरून याप्रश्नी कुठलीही दखल घेतली जात नसून, प्रत्येक वेळी याकडे दूर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

आता तहसील कार्यालय प्रांगणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर आशा वाहनाची संख्या वाढत असताना तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोरच या वाहनांचा खच पडलेला आहे. पोलीस ठाण्यासमोरील पुरवठा विभागाजवळील जागेत तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या परंतु सध्या बंद अवस्थेतील वसाहतीच्या आवारात ही वाहने पडलेली आहे. तहसील कार्यालयात वाहन पार्किंग साठी असणाऱ्या जागेवर वाहने पडून असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची वाहने लावण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तसेच परिसरात या वाहनांमुळे अस्वच्छता देखील झाली आहे, तसेच या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून लिलावसाठी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.