Breaking News

ग्रामविकासाच्या योजना राबविण्यासाठी गटातटाचे राजकारण सोडून एकत्र यावे- सभापती नागवडे


श्रीगोंदा / प्रतिनिधी/ - सरकार विकासकामांसाठी थेट ग्रामपंचायतींना मोठा निधी देत आहे. गावात अधिकाधिक कामे करण्याची मोठी संधी आहे.मात्र गावातील राजकारण विकासातील अडसर ठरु पहात आहे. ग्रामविकासाची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी ग्रामस्थांनी सजग राहिले पाहिजे. गावातील राजकीय गट-तट बाजूला ठेवून विकासाकामांसाठी एकत्र येवून काम करावे. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी केले आहे.
तालुक्यातील सुरेगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपुजन नागवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते गुरुवार,८ फेब्रुवारीला करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृक्षमित्र आबासाहेब मोरे होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, जिल्हा परिषदेचा निधी तालुक्यात अधिक यावा यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. शिवाय राज्य व केंद्र सरकारचा निधी मिळविण्यासाठी ही पाठपुरावा सुरुच आहे. माझ्या जिल्हा परिषद गटात नसलेल्या सुरेगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. असे सांगून त्या म्हणाल्या की, विकासकामांच्या बाबतीत आपण कमी पडणार नाही.वाट बिकट असली तरी अडथळ्यांवर मात करुन तालुक्याला अधिकाधिक न्याय व निधी देण्यासाठी मी कार्यरत आहे. पक्ष,गट-तट, आपला- परका असा भेदभाव न करता काम करण्याचा आपला प्रयत्न आहे. सुरेगांव हे आनंद आश्रम स्वामींची पुण्यभूमी असून राज्यभरातून मोठ्या संख्येने येथे भाविकांची ये जा असल्याने येथील विकासकामांना प्राधान्याने निधी देण्याचे आश्वासन नागवडे यांनी दिले.