Breaking News

विना वीज कनेक्शन; वीजबिल मात्र सुरुच.


कर्जत /प्रतिनिधी/-महावितरण आपल्या दारी या योजने अंतर्गत २०१३ साली वीज वितरण कडे विजेसाठी अधिकृत कोटेशन भरलेले असताना देखील वीज वितरणने वीज कनेक्शन तर दिले नाहीच. मात्र गेली दोन वर्षापासून वीजबिल मात्र सुरु केले असून याविरुद्ध ग्राम पंचायतीने ठराव करूनही करपडी येथील शेतकर्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 
निवेदनात म्हटले आहे की , कर्जत तालुक्यातील करपडी येथील सोमीनाथ संभाजी काळे,शशीकांत विनायक काळे, आबासाहेब दिगंबर काळे, अशोक प्रल्हाद गांधले, द्वारकाबाई बाळासाहेब निकम, रामदास विठ्ठल काळे व इतर यांनी २०१२ ते २०१६ या काळात वीज वितरणच्या महावितरण आपल्या दारी या योजने अंतर्गत अधिकृत विजेसाठी कोटेशन भरले. मात्र त्यांना अद्याप ही वीजजोड देण्यात आलेला नाही. याबाबत करपडी ग्राम पंचायतीने १३ मे १७ च्या ग्रामसभेत या शेतकर्यांना त्वरित वीजजोड देण्यात यावेत असा ठराव घेतला होता. येथील अशा लोकांना मात्र वीज वितरण कडून वीज बिल मात्र नियमित दिले जात आहे. या सर्व अनैतिक प्रकारास कंटाळून करपडी येथील या शेतकर्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून दि २२ जाने रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला असल्याची माहिती सुनील काळे यांनी दिली आहे.