Breaking News

पद्मावत सिनेमा विरोधात सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा; शेकडो कार्यकर्त्यांना अटक

मुंबई, - पद्मावत सिनेमा प्रदर्शित करण्यास सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली असली तरी राजपूत समाजाचा विरोध अजूनही कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर आज राजपूत समाजाचे नेते अजयसिंह सेंगर व अन्य संघटनांच्या वतीने आज मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन ताडदेव पोलीस ठाण्यात नेले.


या मोर्चात महाराणा प्रताप बटालियन, हिंदू राष्ट्र सेना, महाराणा बिग्रेड, अ.भा. क्षत्रिय महासभा, राष्ट्रीय करनी सेना, हिन्दू सेना, हिन्दू महासभा, महाकाल सेना, राजस्थान राजपूत परिषद आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सेन्सॉर बोर्डाने पैसे खाऊन पद्मावती सिनेमास अनुमति दिली असल्याचा आरोप सेंगर यांनी केला. इस्लाम व ख्रिश्‍चन धर्माचा अपमान करणार्‍या सिनेमावर त्वरित बंदी घातली जाते. मात्र हिंदु धर्माचा जेव्हा अपमान होतो तेव्हा सेन्सॉर बोर्ड व केंद्र सरकार काहीच करत नाही. फक्त चित्रपटाचे नाव बदलून हिंदूंची दिशाभूल केली जात आहे. हिंदुच्या गौरवशाली इतिहासास कलंक लावू देणार नाही. राज्यात कोणत्याही परिस्थितीत हा सिनेमा चालू देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य केली नसल्याने आम्ही हे पाऊल उचलले असल्याचेही सेंगर यांनी सांगितले. राज्यात या सिनेमाबंदी न घातल्यास मुख्यमंत्र्यांनाही घेराव घालू असा इशाराही सेंगर यांनी दिला.