Breaking News

हिवरेबाजार मॉडेल समोर ठेवून ग्रामविकास करा.


अहमदनगर  - आदर्श कामातून हिवरेबाजार गावाने जगासमोर आदर्श ठेवला आहे, हिवरेबाजार मॉडेल समोर ठेवून प्रत्येक गावाने ग्रामविकासासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी हिवरेबाजार येथे केले.
देशमुख यांनी आज सकाळी हिवरेबाजारमधील विविध विकासकामे, वनीकरण, शेती, गावातील सुविधा,पर्यटन केंद्र या व इतर विकासकामांची पाहणी केली, ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सहकारमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे आदी उपस्थित होते.

पोपटराव पवार यांनी हिवरेबाजार येथील विकासकामे व गावचा आजपर्यंतचा प्रवास याबाबत सविस्तर माहिती देशमुख यांना दिली.

ग्रामस्थांशी संवाद साधतांना देशमुख म्हणाले, पोपट पवार यांनी गाव विकासाचे केंद्रबिंदू मानले व कामात पारदर्शकता ठेवली, यामुळेच गाव देशाच्या नकाशावर आले. गावाला आवश्यक असलेल्या वस्तू गावातच तयार करता येतील त्यादृष्टीने ग्रामस्थांनी नियोजन करावे व पॅकिंग युनिटसाठी पणनकडे प्रस्ताव पाठवावा. माझ्या तालुक्यातील सरपंच व सेवा सोसायटीचे चेअरमन यांना हिवरेबाजार भेटीसाठी घेऊन येणार आहे. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.