Breaking News

पुरोगामी विचारसरणीमुळे ओबीसींच्या विघटन परिषदेचा फज्जा आ. राठोडांची संघ दलाली पराभूत; बारा बलुतेदार जातीत फुट नव्हे तर सांघिक प्रयत्न आवश्यक

अहमदनगर/विशेष प्रतिनिधी : कम्युनिस्टांच्या बालेकिल्यांत भाजपा कसा फोफावला या शरद पवार यांच्या शंकेला भाजपाची पितृसंस्था असलेल्या, संघ प्रेरीत ओबीसी परिषदेचा फज्जा उडवून, त्याच बालेकिल्यात पुरोगामी विचारसरणीकडून उत्तर मिळाल्याने जातीय तेढ निर्माण करून छुपा धार्मिक अजेंडा राबविणार्‍या शक्तींना या मातीत थारा नाही हेच स्पष्ट झाले. आ. हरिभाऊ राठोड यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुप्त इच्छा पुर्ण करण्यासाठी शिर्डी येथे आयोजित केलेल्या ओबीसी परिषदेला अहमदनगर जिल्हा परिसरातील पुरोगामी विचारांनी बहिष्कृत केल्याने अत्यल्प प्रतिसाद लाभलेली ही परिषद सपशेल बारगळली.


आ. हरीभाऊ राठोड यांनी आपले राजकीय समीकरणे यशस्वी करण्यासाठी शिर्डी येथे शनिवार दि. 27 जानेवारी रोजी ओबीसी परिषदेचे आयोजन केले होते. ओबीसी प्रवर्गातील बारा बलुतेदार जातींचे विभाजन करून आरक्षणाचा वाटा त्या त्या जातीला मिळावा असा गोंडस अजेंडा राबविण्याची मागणी करण्यासाठी या परिषदेचे आयोजन केल्याचे वरवर दाखविले जात असले तरी जाती जातीत फुट पाडून गावपातळीवर असलेला सामाजिक सलोखा उध्वस्त करायचा आणि गटातटात विखुरलेल्या समाजाच्या क्षीण शक्तीचा फायदा घेऊन धार्मिक अजेंडा मजबूत करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भयावह खेळी या परिषदेच्या आयोजनामागे होती. हा डाव दै. लोकमंथनने चव्हाट्यावर आणून आ. हरिभाऊ राठोड यांना संघाची दलाली न करण्याचे आवाहन केले होते.
ही परिषद अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे होत असल्याने जातीय सलोख्याच्या मुद्यावर वेळ, स्थळाच्या दृष्टीने आणि अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक विचारसरणीच्या पार्श्‍वभुमीवर या परिषदेला विशेष महत्व प्राप्त झाले होते. अहमदनगर जिल्ह्याची राजकीय आणि सामाजिक पार्श्‍वभुमी लक्षात घेता जातीय शक्तींचा बिमोड करण्यात ही भुमी नेहमीच संघर्षाच्या पावित्र्यात दिसते. डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेला हा जिल्हा जातीय वादी शक्तींना नेहमी विरोध करीत आला आहे. हाच धागा पकडून तीन चार दिवसापुर्वी सहकार महर्षी यशवंतराव गडाख यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात शरद पवार यांनी जिल्ह्याच्या भाजपा प्रवेशावर सुचक भाष्य केले होते.

या पार्श्‍वभुमीवर आ. हरिभाऊ राठोड यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिर्डी येथे ओबीसींना गळाला लावण्याची कुटनिती असलेली परिषद आयोजित केली होती. दै. लोकमंथनने या परिषदेच्या आयोजनात संघाचा सहभाग आणि त्यामागचा हेतू काय आहे हे जाणून घेण्याचे आवाहन बहुजन समाजाला केले होते. संघाला छोट्या छोट्या जातीत असलेला सलोखा नष्ट करून जातीय तेढ निर्माण करायची आहे. आ. हरिभाऊ राठोड संघाचीच भाषा बोलत असल्याने दै. लोकमंथनने या परिषदेला विरोध करून पुरोगामी विचारांची बैठक असलेल्या बहुजन ओबीसींनी ही परिषद हाणून पाडावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने शिर्डीत अवघ्या शे दीडशे जणांची उपस्थिती लाभली. स्थानिकांची अनुपस्थिती हे पुरोगामी शक्तींनी जातीय वाद्यांवर मिळवलेला विजय अजून परिषदेला उपस्थित असलेल्या मंडळींमध्ये ओबीसी बहुजन किती हा शोधाचा मुद्दा आहे. थोडक्यात महाराष्ट्राला पुरोगामी, डाव्या विचारांची बैठक असलेल्या चळवळीचा वारसा असलेल्या जिल्ह्याने आ. हरिभाऊ राठोड, गोबरे यांच्या सारख्या जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी करणार्‍या संधीसाधू पुढार्‍यांना सणसणीत चपराक लावली आहे.

ओबीसींचे प्रश्‍न मार्गी लागावेत हा आमचा अजेंडा आहे. मात्र सुक्ष्म जातींमध्ये फुट पाडून हे प्रश्‍न मार्गी लागणार नाहीत. तर सर्वांची एकत्र मोट बांधून सांघिक ताकदीवर ओबीसींना आपले हक्क मिळवावे लागतील. आधी ओबीसींची जनगणना करण्यास अग्रक्रम द्यावा लागेल. शिर्डी परिषदेचा हेतू लक्षात आल्याने आमच्या सारखे सुक्ष्म ओबीसी जातीतील मंडळींनी या परिषदेचा निषेध करून पाठ फिरवली.
- अशोक सोनवणे.राष्ट्रीय क्रांतीसूर्य ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष