Breaking News

‘हॉर्न नॉट ओके प्लीज’संदर्भात मंत्रालयात स्वाक्षरी मोहीम


ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी परिवहन विभागासह इतर अनेक जणांच्या उत्स्फूर्त सहभागातून राबविण्यात येत असलेल्या ‘हॉर्न नॉट ओके प्लिज’ मोहिमेसंदर्भात आज मंत्रालयात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. सायंकाळपर्यत सुमारे २०० जणांनी यात सहभाग घेऊन वाहन चालविताना हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला. मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयात विविध कामासाठी आलेले अभ्यांगत आदींनी फलकावर स्वाक्षरी करुन तसा संकल्प केला.
मागील साधारण दोन महिन्यापासून राबविल्या जात असलेल्या ‘हॉर्न नॉट ओके प्लिज’ मोहिमेतून आतापर्यत साडेतीन लाखांपेक्षा अधिक वाहनचालकांनी विनाकारण हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेदरम्यान सुमारे २ लाख खासगी आणि शासकीय वाहनांवर ‘हॉर्न नॉट ओके प्लिज’चे स्टिकर्स चिकटविण्यात आले आहेत. यातून ही मोहीम गतिमान झाली आहे. काल झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्येही सुमारे ३०० जणांनी सहभाग घेऊन ‘हॉर्न नॉट ओके प्लिज’चा संदेश दिला.