व्याघ्रगणनेसह वन्यजीव जीपीएएस गणनेवर वनपाल, वनरक्षकांचा बहिष्कार
रत्नागिरी, दि. 13, जानेवारी - वनरक्षक, वनपालांना पोलीस व महसूल विभागाप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. नव्या वर्षात 20 ते 25 जानेवारीला होणार्या व्याघ्र गणना व वन्यजीव गणना कामात वनपाल, वनरक्षक जीपीएस प्रणाली वापरण्यावर बहिष्कार घालणार आहेत, अशी माहिती वनपाल, वनरक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय भागवत यांनी पत्रकारांना दिली.
भागवत म्हणाले, वनरक्षक व वनपाल जंगल संपत्ती व वन्यजीवांचे संरक्षणाचे काम करतात. त्यासाठी त्यांना देण्यात येणारे वेतन तुटपुंजे आहे. त्यामुळे वेतनवाढ व्हावी, ही मागणी वनरक्षक, वनपाल संघटनेची मागणी आहे. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गाने पाठपुरावा केला, मात्र त्यातून त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे निर्णायक आंदोलनाचा भाग म्हणून वन्यजीव गणनेसाठी जीपीएस प्रणालीचा वापर करण्यावर संघटना बहिष्कार घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात वाघांची संख्या किती आहे, हे निश्चित करण्यासाठी वन्यजीवांची गणना केली जाते. अशी गणना एकाच वेळी होते. त्यासाठी यंदा 20 ते 25 जानेवारीला वन्यजीव गणना होणार आहे, या कामात आजवर वनरक्षक व वनपालांचा सर्वाधिक वापर झाला. प्रत्येक वनरक्षक, वनपालाला जंगली भागात रोज पाच किलोमीटर चालावे लागते. चालताना वन्यजीवांच्या पावलांचे ठसे घेणे, विष्ठा तपासणे, वन्यजीवांचे अवशेष सापडतात का, हे पाहणे असे काम केले जाते. यातून त्या परिसरात कोणते वन्यजीव आहेत, त्यांची संख्या किती आहे, याचे तर्क ठोस पुरावे नोंदवून घेत वन्यजीव गणना होते.
गेल्या पाच वर्षांत अशा गणनेसाठी जीपीएस तंत्रज्ञान वापरले जाते. या प्रणालीद्वारे वनरक्षक, वनपाल कोणत्या भागातून किती ठिकाणी चालत गेले, त्यांची दिशा व अंतर किती, त्यासह अन्य नोंदी घेतल्या जातात. तसेच निरीक्षणात किती वन्यजीवांचे अस्तित्व आढळले याची माहिती नोंदविली जाते. सर्व माहिती डेहराडून येथील राष्ट्रीय प्राणी गणना विभागाकडे पाठविली जाते. वनपाल, पनरक्षकांच्या बहिष्कारामुळे वनसंरक्षणातील महत्त्वाचे असलेले वन्यजीव गणनेचे काम केवळ अंदाजावर होण्याची शक्यता आहे.
सुधारित वेतन मागणीसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही जीपीएस प्रणालीवर बहिष्कार घालणार आहोत; मात्र गणनेचे काम पूर्वीच्या पद्धतीने करणार आहोत. त्याची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. मागणी मान्य केल्यास आम्ही बहिष्कार मागे घेणार आहोत, असे उदय भागवत यांनी सांगितले.
