कोरेगाव भीमा प्रकरणी मला टॉर्गेट करण्याचा प्रयत्न : जिग्नेश मेवाणी
नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणावर अखेर जिग्नेश मेवाणी यांनी अखेर आपले मौन सोडले असून, भीमा-कोरेगाव प्रकरणी आपल्याला संघ आणि भाजपवाले हकनाक टार्गेट क रताहेत, असा आरोप जिग्नेश मेवाणी यांनी केला. आपण कुठलेही भडकाऊ भाषण केले नाही. अथवा बंदला समर्थन दिले नाही. तरीही मला विनाकारण टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप मेवाणी यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी भीमा-कोरेगाव प्रकरणावर का बोलत नाहीत, असा सवालही मेवाणी यांनी केला.
9 तारखेला दिल्लीत युवा-हुंकार रॅली काढण्याची घोषणाही जिग्नेश मेवाणी यांनी केली. त्यानंतर संविधान आणि मनुस्मृती घेऊन पंतप्रधानांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात निकालानंतर महाराष्ट्रातल्या काही भाजपविरोधी संघटनांनी जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदला विशेष आमंत्रित करून पुण्यातल्या शनिवारवाड्यावर पेशव्यांच्या विरोधात एल्गार परिषद भरवली होती. या सभेत जिग्नेश मेवाणी यांनी मोदी सरकारची तुलना आधुनिक पेशवाईची करत भाजप आणि संघवाल्यांविरोधात जोरदार हल्लाबोल चढवला होता. याच भाषणात जिग्नेश मेवाणी यानी भडकाऊ भाषा वापरल्याचा आरोप होत त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला.
