Breaking News

कोपरगावात कृषी सहाय्यक पद रिक्त ; कापूस बोंडअळीचे पंचनामे रखडले


कोपरगाव ता. प्रतिनिधी - ऊसाचे असणा-या कोपरगाव तालुक्यातील शेतक-यांनी ऊस आणि कांद्यांना फाटा देत पर्याय आणि चांगले पैसे मिळतात म्हणून कपाशीची लागवड केली. कपाशीला प्रतिक्विंटलला पाच ते सहा हजारांचा भाव मिळाला. शासनाच्या धोरणाचा फटका येथेही शेतकऱ्यांना बसला. भाव समाधानकारक तर नाहीच. पण जोमदार आलेल्या कपाशीवर शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने पांढऱ्या सोन्याचे वाटोळे झाले. यात भरीत भर म्हणजे कोपरगावात कृषी सहाय्यक पद रक्त असल्याने कापूस बोंडअळीचे पंचनामे रखडले आहेत. 
तालुक्यात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने तालुक्यातील चार पाच गावांचे पंचनामे रखडले आहेत. बोंडअळीने बाधीत झालेल्या कपाशी क्षेत्राचे पंचनामे वेगाने सुरु आहेत. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तालुक्यात अजूनही बाधित गावांचे पंचनामे करणे बाकी आहेत. यात कान्हेगाव, खिर्डीगणेश, अंचलगाव, मळेगाव थडी आदी गावांचा समावेश आहे.

तालुक्यातील कोपरगावसह पोहेगाव, सुरेगाव, दहिगाव बोलका, रवंदे, महसुल मंडळातील आकडेवारीनुसार ३ हजार १०६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झालेली आहे. दि.२७ डिसेंबर अखेर तालुका कृषी कार्यालयामार्फत ६ हजार ३५९ शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या २ हजार ४८४ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे केले आहेत. २ हजार ८६५ शेतकऱ्यांचे १ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्याचे बाकी होते. पंचनाम्यांचे काम जोरात चालु असले तरी अपुरा कर्मचारी वर्ग यात मोठा अडथळा ठरत आहे. कोपरगाव मंडळ कृषी ८ पोहेगाव ५ कोळपेवाडी कृषी मंडळ ९ असे फक्त २२ कृषी सहाय्यक आहेत. तब्बल १४ कृषी सहाय्यक पदे रिक्त आहेत. प्रत्येक कृषी सहाय्यकाकडे ४ ते ५ गावे पंचनाम्यासाठी देण्यात आली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात कपाशी क्षेत्र जास्त असल्याने व कर्मचाऱ्यांची वानवा हेच पंचनामे रखडण्याचे मुख्य कारण आहे.

सध्या कालव्यांना पाणी चालू आहे. पंचनामे होईपर्यंत कपाशी पिक तसेच उभे ठेवावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या दुसऱ्या पिकांसाठीच्या मशागती खोळंबल्या आहेत. पंचनाम्यांसाठी कृषी विभाग पथकाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. कालव्यांचे पाणी बंद होण्याअगोदर कर्मचारी वाढवून पंचनामे करावे, अशी मागणी कापूस उत्पादकांनी केली आहे. तलाठी या पथकाचे अध्यक्ष ग्रामसेवक सचिव, तर कृषी सहाय्यक तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पहात आहेत. जीपीएस कॅमेरा अँप फोटोवर अक्षांश रेखांश येत असल्याने बोगस पंचनाम्यांना यात कुठेही वाव दिसत नाही.