Breaking News

अग्रलेख - राजकारणातील अभिमन्यू


महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाची दिशा आणि दशा पाहिल्यानंतर कळत नकळत महाभारतातील एका प्रसंगाची आठवण होते. आईच्या पोटात चक्रव्यूह तयार करण्याची कला समजून घेणारा अभिमन्यू दुर्दैवाने आईला आलेल्या निद्रेमुळे तो भेदण्याचे तंत्र अवगत करू शकला नाही. आणिबाणीच्या प्रसंगी चक्रव्युहातून पडण्याचा मार्ग न सापडलेल्या अभिमन्यूप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था झाली किंवा कसे यावर मत भिन्नता असू शकते, मात्र राजकारणात एक अभ्यासू म्हणून ख्याती पावलेला नेता आज काञीत सापडला आहे हे नक्की. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. प्रसंग कुठलाही असो, मात करण्याचे कसब त्यांनी साधले होते. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून असलेल्या माध्यमांनाही त्यांनी संधी दिली नाही.आजवर मराठी भाषीक माध्यमे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गेली असा दिवस दुर्मिळच. अगदी मराठा क्रांती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा, भुजबळांच्या समर्थनार्थ भुजबळ प्रेमींनी काढलेला ओबीसी मोर्चा, किसान क्रांती मोर्चाने पुकारलेला शेतकरी संप, विरोधकांचा हल्लाबोल यासारख्या सरकारच्या दृष्टीने नाजूक असलेल्या बाबीही राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनिय हाताळल्या, प्रत्येक वेळी समस्याचा आढावा घेऊन समस्याग्रस्त घटकाच्या दुखर्‍या नसेला मसाज करण्याचा वकूब या काळात त्यांनी दाखवला. माध्यमांनीही या वकूबाला दाद देऊन फडणवीसांचे वेळोवेळी कौतूक केले.

आज परिस्थिती मात्र थोडी वेगळी आहे. गेली तीन वर्ष मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचा अनुभव घेतल्यानंतर फडणवीस विरोधकांसह माध्यमही त्यांच्याविरोधात षड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या विरोधकांना नामोहर्रम करण्यासाठी डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून संधी मिळेल तेंव्हा हिशेब करतात याचा अनुभव त्यांच्या राजकीय विरोधकांसह माध्यमांनीही तीन वर्षात अनेकदा घेतला आहे.म्हणूनच आता बदललेल्या परिस्थितीत गेल्या तीन वर्षातील सारा हिशेब चुकता करण्याची तयारी फडणवीस विरोधकांनी केल्याचे चिञ दिसत आहे. सध्या मराठा, दलित, धनगर, शेतकरी असे महाराष्ट्रातील चार मोठे निर्णायक सामाजिक घटक देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांच्या खुर्चीखाली राजकीय स्फोटके पेरण्याची तयारी प्रगतीपथावर आहे. परिणामी प्रतिकूल परिस्थितीत बिळात लपून बसलेले सारेच तोंड बाहेर काढून आरडाओरड करू लागले आहेत. मुख्यमंत्री ब्राम्हण आहेत म्हणून काही काळ त्यांच्याविरूध्द जातीय विखारही पेरला गेला पण त्यांच्या एकूण मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत ब्राम्हण म्हणून समाजासाठी एकही काम केल्याचे आठवणीत नाही.उलट मराठा समाजासह अन्य बहुजनांच्या पदरात काही ना काही टाकण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपुर्वक केला. फडणवीस हे संघाच्या मुशीत तयार झाले आहेत. रेशीमबागेत हसत खेळत बिंबवले संस्कार त्यांना कट्टर संघवादी म्हणून करण्यात महत्वाचे ठरले हे जेव्हढे खरे तेव्हढेच हेही लक्षात घ्यायला हवे की नागपूरमध्ये अर्ध्या चड्डीत तयार झालेला हा राजकीय पहिलवान आपले ब्राम्हणत्व कारभारातून सहजासहजी दाखवणार नाही. फडणवीस यांच्यासाठी ब्राम्हण असणे ही लायबलेटी आहे, असेट नाही हे त्यांनी आपल्या प्रत्येक निर्णयातून दाखवून दिले आहे. विद्यमान परिस्थितीत भिमा कोरेगावच्या संघर्षानंतर मात्र त्यांचे ब्राम्हण असणे जरा उथळपणे अडचणीचे ठरू पहात आहे.

भिमा कोरेगावमुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते दिशाहीन झाल्याने अडचणीत सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही याला अपवाद नाहीत. भिडे-एकबोटे यांचा या दुर्दैवी घटनेत सहभाग असल्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीचे ठरू शकतात. अन्य राजकीय पक्षांसह भाजपातील ब्राम्हण चेहरा असलेली मंडळी या घटनेनंतर सामाजिक अपराधी म्हणून निर्देशीत होऊ लागले आहेत. डावे आणि पुरोगामी संघाला पहिल्यापासून मनुवादी म्हणून सातत्याने टोकत आहेतच. राष्ट्रवादी किंबहूना शरद पवार मराठा संघटनांच्या आक्रमकतेचा,तर कधी शेतकर्‍यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर अंकूश ठेवून आहेत. अस्ताला जाऊ पाहणारी किंवा नेतृत्वाने भाजपाचे मांडलिकत्व स्वीकारल्यामुळे दात नसलेल्या वाघासारखी अवस्था झालेल्या रिपब्लिकनच चळवळीत बाळासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने पुन्हा संजीवनी निर्माण झाली आहे. थोडक्यात विद्यमान राजकीय आणि सामाजिक परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने प्रतिकुल दिसत आहे. अर्थात ही परिस्थिती निर्माण होण्यास मुख्यमंत्री म्हणून ते स्वतः जबाबदार आहेत. हे नाकारता येणार नाही, मात्र यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतांना त्यांची होणारी तारांबळ त्यांचा राजकीय अभिमन्यू करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.