Breaking News

महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतक-याला फटका


सातारा, दि. 08, डिसेंबर - महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका पुन्हा एकदा शेतक-यांला बसला असून पिंपरद ता.फलटण येथील शेतक-यांचा 1 एकर ऊस साडे तीन एकर ड्रिप असे एकूण 2 लाख 54 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.


पिंपरद, ता.फलटण येथील शेतकरी तुकाराम बाळासो ढमाळ यांचा 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 दरम्यान गट क्र 35 मधील महावितरणच्या तारेचे शाँर्टसर्किट होऊन एक एकर ऊस व साडे तीन एकरातील ड्रिप जळून सुमारे 2 लाख 54 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. यापूर्वी पिंप्रद ग्रामपंचायतीने संभाव्य धोका ओळखून धोकादायक तारा,पोल, डीपी या दुरुस्ती करण्याबाबत ठराव केला होता. या ठरावात तुकाराम बाळासो ढमाळ यांचे नाव होते या ठरावाची प्रत अर्ज सोबत महावितरण कार्यालयास देण्यात आली होती. 

महावितरणने ग्रामपंचायतीच्या अर्जाची दखल घेत त्या अनुषंगाने ऊस शेतातील लोंबणा-या ताराची दुरुस्ती केली असती तर ऊस जळाला नसता. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागांत सर्रास महावितरणच्या वाकडे पोल, लोंबत्या तारा, उघडे डीपी हे चित्र पहायला मिळत असून महावितरण अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन अनेक ठिकाणी पिक जळण्याच्या घटना घडतात. तक्रार अर्ज व ठराव देऊनही त्यांची दखल न घेणा-या महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.