Breaking News

नगराध्यक्षांना डांबणार्‍या दोघा नगरसेवकांविरोधात पोलिसात तक्रार

रत्नागिरी, दि. 08, डिसेंबर - चिपळूणच्या नगराध्यक्ष व महिला नगरसेविकांना सभागृहातून बाहेर जाण्यास जाणीवपूर्वक अटकाव केल्याप्रकरणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात आज तक्रार देण्यात आली. नगराध्यक्षांसह सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. 


नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गेल्या 4 डिसेंबरला सायंकाळी चार वाजता पालिकेची सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेला उपस्थित असलेल्या नगरसेवकांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर साडेचार वाजता राष्ट्रगीताने सभा संपली. सभेच्या दरम्यान विरोधी पक्षानी मोठा हंगामा केला. सभा संपल्यानंतरही दहशतीचे वातावरण होते म्हणून मी व सत्ताधारी गटाच्या नगरसेविका वर्षा जागुष्टे, सफा गोठे, शिवारी पवार, रसिका देवळेकर आदी माझ्या अँटी चेंबरमध्ये बसलो होतो. विरोधी पक्षाचे नगरसेवक उमेश सकपाळ सभा संपल्यानंतर आले आणि आरडाओरड करू लागले. ते उशिरा आल्याची नोंद पालिकेचे लिपिक प्रसाद देवरूखकर यांनी मिनिट बुकात केली होती. 

आम्ही सभागृहातून बाहेर जात असताना उमेश सकपाळ यांनी हातवारे करून आणि जोरजोरात ओरडून आम्हाला बाहेर जाण्यास अटकाव केला. दरवाजाजवळ उभे असलेले मनोज शिंदे यांना दरवाजाला कडी लावण्यास सांगितले. सकपाळ यांच्या सांगण्यावरून शिंदे यांनी दरवाजाला कडी लावली. त्यानंतर सकपाळ यांनी बाहेरून कडी लावण्यास सांगितले. त्यामुळे आमच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही मी माझ्या सहकारी नगरसेवकांना कडी उघडण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो, अशी तक्रार खेराडे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.