Breaking News

राज्यातील दहा शाळा होणार आंतरराष्ट्रीय

पुणे : राज्यात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शंभर शाळा निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शाळा निवडीसाठी शिक्षण विभागाने सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार असून या शाळा उर्वरित 90 शाळांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील. या शाळा अनुक्रमे ‘ओजस’ आणि’ तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ओळखल्या जाणार आहे. 


प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षण विभागाने राज्यात शंभर शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला आहे. त्यानुसार काही दिवसांपासून या शाळांसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरूवारी शासन निर्णयाद्वारे पुन्हा सुधारीत निकष व प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ओजस शाळांमधून मुंबई व पुणे शहराला वगळण्यात आले आहे. या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय शाळांचे उत्तम उदाहरण असणार्‍या शाळा पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

तेजस शाळांसाठी सर्व महापालिका क्षेत्रातून प्रत्येकी 1 व जिल्हाच्या ग्रामीण भागातील किमान 2 शाळांची निवड केली जाईल. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येकी 2 शाळांची निवड केली जाणार आहे. या शाळा प्रत्यक्षात फेब्रुवारी 2018 पासून सुरू होतील. तर मार्च 2021 आणि 2022 मध्ये विविध आंतरराष्ट्रीय चाचण्यांना सामोरे जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. 

अर्ज करण्यासाठी विद्या प्राधिकरणामार्फत स्वतंत्र लिंक केली जाणार असून त्यावर केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालविल्या जाणार्‍या अनुदानित शाळांकडून नाव नोंदणी करता येणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या शाळांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती शाळांची निवड करेल.