Breaking News

दोन दिवसात निर्णय न घेतल्यास रेल रोको आंदोलन करणार - जितेंद्र आव्हाड

ठाणे, दि. 11, नोव्हेंबर - मुंब्रा रेतीबंदर येथील नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत आहेत. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने रेल रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठक घेऊन या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याचे आश्‍वासन मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी दिले आहे. या संदर्भातील लिखित पत्र देण्यात येणार आहे. मात्र, आगामी दोन दिवसात लेखी पत्र न दिल्यास सोमवारी 13 नोव्हेंबर रोजी रेल रोको आंदोलन अटळ असल्याचा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. 
मुंब्रा रेतीबंदर येथील बोगद्यानजीक मोठी लोकवस्ती आहे. या लोकवस्तीला मुख्य रस्त्यावर येण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसल्याने रेल्वे रूळ ओलांडावे लागत असतात. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. सध्या या ठिकाणी दुतर्फा भिंत बांधण्यात येणार आहे. मात्र, स्थानिक नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मार्ग ठेवण्यात येणार नाही. त्यामुळेच आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी रेल रोक आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर जाग आलेल्या मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी आज शासकीय विश्रामगृहामध्ये तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मध्य रेल्वेचे अधिकारी रिझवान अहमद, अशोक सिंह यांनी या रेल्वे पादचारी पुलाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असून त्यासंदर्भातील पत्र आव्हाड यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.