शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही - नारायण राणे
विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपची रणनिती मला पटल्यानेच मी निवडणूक लढवत नाहीये. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही, असा खुलासा नारायण राणेंनी दिला आहे.
नारायण राणे म्हणाले, '' काल रात्री मुख्यमंत्री आणि माझी बैठक वर्षावर झाली. त्यावेळी भाजपची भूमिका त्यांनी मला सांगितली आणि मला ती पटली त्यामुळे मी ही निवडणूक लढवत नाही. शिवसेनेमुळे मला उमेदवारी मिळाली नाही हे मी मानायला तयार नाही. मला उमेदवारी मिळाली असती आणि शिवसेनेचा विरोध असता तरी १०० टक्के मीच निवडून आलो असतो.
राणेंनी राजीनामा दिलेल्या जागेवर भाजपने त्यांच्याऐवजी प्रसाद लाड यांना संधी दिल्याने, राणे भाजपवर संतापल्याचं बोललं जातं होतं. त्यावर नारायण राणेंनी हा खुलासा केला. काल रात्री मुख्यमंत्र्यांनी राणेंची समजत काढली होती, नारायण राणेंनीही ही बाब मान्य करत रात्रीच्या बैठकीत नेमकं काय झालं हे सांगितलं नसलं तरी माझं समाधान झाल्याचं स्पष्ट केलंय.