Breaking News

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या वाढीव मोबदल्यासाठी लढणार - नीलेश राणे

रत्नागिरी, दि. 22, नोव्हेंबर - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये लांजा, चिपळूण, कणकवली शहरांमधील जमिनींना अगदी कवडीमोल भावाने दर लावला गेला असून त्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे फेरसर्वेक्षण करून जागेला योग्य तो मोबदला देण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी राहील. या अन्यायाविरोधात कठोर लढाई उभी करून महामार्गावरील कोकणातील सर्वच शहरांमध्ये निर्माण झालेला जागेच्या दराचा प्रश्‍न महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून सोड विणारच, अशी ग्वाही पक्षाचे नेते, माजी खासदार नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.



लांजा शहरातील भूसंपादन प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर जमिनींचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने झाले आहे. जमिनींचा मोबदला ग्रामीण भागाप्रमाणेच मिळणार असल्याने नागरिक व व्यापार्‍यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रकल्पबाधित नागरिक व व्यापार्‍यांची व्यथा जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या, प्रश्‍नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी लांजा शहर महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधित कृती समितीची बैठक माजी खासदार निलेश राणे यांच्यासोबत आज लांज्याच्या शासकीय विश्रामगृहात पार पडली. बैठकीत नागरिकांनी न्याय मिळावा, ही अपेक्षा व्यक्त केली. 

बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राणे यांनी आपली भूमिका प्रकल्पबाधित जनतेच्या वतीने स्पष्ट केली. ते म्हणाले की, चुकीच्या पद्धतीने सर्व्हे करून मूल्यांकन व दर आकारणी केल्याने भूसंपादन प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत. मिळत असलेला दर गावातील जमिनीप्रमाणेच असल्याने तो शहरातही चौपट मिळाला पाहिजे. रेडीरेकनरच्या तुलनेत झालेले मूल्यांकन जमिनीच्या आजच्या बाजारभावाच्या तुलनेत फारच कमी आहे. यामुळे नागरिक, व्यापारी व छोटेमोठे व्यावसायिक उद्ध्वस्त होणार आहेत. 

रेडीरेकनरच्या कमी दरामुळे येथील जमीन मालक व व्यापार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शहरात झालेले मूल्याकंन हे रेडीरेकनरच्या चौपट मिळावे, या हक्काच्या मागणीसाठी प्रसंगी संघर्ष उभा करू. यामध्ये कोणतेही राजकारण राहणार नाही. हा संघर्ष क ोणत्याही टोकावर नेण्याची आमची तयारी आहे. जनतेला न्याय मिळालाच पाहिजे. त्याकरिता महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष प्रशासनाशी दोन हात करेल. पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला न्या मिळवून देणारच, अशी ग्वाही नीलेश राणे यांनी यावेळी दिली.

राणे म्हणाले की, महामार्ग व्हावा ही कोकणी जनतेची आग्रही मागणी आहे. परंतु हे होताना लोकांवर अन्याय होत असेल तर तो कधीच सहन केला जाणार नाही. समृद्धी महामार्गासाठी यांच्याकडे पैसे असतील तर मुंबई-गोवा महामार्गासाठी पैसे का नाहीत हा आमचा सवाल आहे. आमचा पक्ष लोकांसाठी, समाजासाठी, लोकांच्या प्रश्‍नांसाठी जमिनीवर उतरून काम करीत आहे. या प्रश्‍नासाठी जो न्यायालयीन लढा द्यावा लागेल त्याची जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून घेतली जाईल. फेरसर्वेक्षण करून जमिनींना योग्य मोबदला मिळेपर्यंत प्रशासनाशी दोन हात करण्याची जबाबदारी आम्ही घेणार असून जनतेने या संघर्षात आमच्यासोबत राहून आपले प्रश्‍न सोडवावेत, हीच माफक अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा