Breaking News

रावेरमध्ये तालुका कृषी विक्रेत्यांची 4 नोव्हेंबरपर्यंत दुकाने बंद

जळगाव, दि. 02, नोव्हेंबर - यवतमाळ जिल्ह्यातील विषबाधा प्रकरणानंतर कृषी विभागाने विक्रेत्यांवरच कारवाई सुरु केली होती. त्या अनुषंगाने 27 रोजी अहमदनगर येथे राज्यस्तरीय बैठक बोलाविण्यात आली होती. त्याबाबत माहिती देण्यासाठी व 2, 3 व 4 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी बंदबाबत निर्णयाची माहिती देण्यासाठी रावेर तालुका कृषी विक्रेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. यात रावेर तालुक्यातून हा पुकारलेला बंद पाळण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले.
रावेर येथील जुन्या सावदा रोडवरील माजी सैनिक सभागृहात ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत आजपासून ते 4 नोव्हेंबरपर्यंत दुकाने बंद ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीपूर्वी रावेर तहसिलदार विजयकुमार ढगे, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार,एस. एस. काळेल यांना बंदबाबतचे निवेदन देण्यात आले. रावेर तालुक्यातील सर्व कृषी केंद्र 02 ते 04 नोव्हेंबर बंद राहणार असून, शेतकरी बांधवांनी त्या आधीच खते किंवा बियाणे घेऊन गैरसोय टाळावी, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.